विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराची ‘रजनी’
By admin | Published: March 6, 2016 02:46 AM2016-03-06T02:46:32+5:302016-03-06T02:46:32+5:30
गोरगरिब विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराचे लोणी शिजविणाऱ्या खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहारात गोलमाल असल्याचा ठपका ...
कलोडे विद्यालयात गोलमाल शिक्षण विभागाचा ठपका मुख्याध्यापिका डहाकेवर कारवाईची शिफारस
जितेंद्र ढवळे नागपूर
गोरगरिब विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराचे लोणी शिजविणाऱ्या खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहारात गोलमाल असल्याचा ठपका जि.प.च्या शालेय पोषण आहार विभागाने ठेवला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या मुख्याध्यापिका रजनी डहाके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात खिचडी वाटपात गोलमाल आहे. तिथे सरकारच्या नियमांचे पालन केले जात नाही. यासोबतच येथील खिचडी शिजविण्याच्या पद्धतीवर ‘लोकमत’ने शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले होते. यानुसार शालेय पोषण विभागाने या विद्यालयाची चौकशी केली. तीत विद्यालयाच्या स्वयंपाकगृहात अग्निशमन यंत्र दिसून आले. मात्र ११ जानेवारीपासून यात रिफिलिंग न केल्याचे दिसून आले. चौकशी पथकाला स्वयंपाकगृहात गॅस सिलेंडर आढळून आले मात्र प्रत्यक्षात आहार हा जळावू लाकडावर शिजविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.