नागपुरात कोरोनातही राख्यांचा ५ कोटींचा व्यवसाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 01:25 AM2020-07-30T01:25:13+5:302020-07-30T01:28:04+5:30
रक्षाबंधनाला आता काहीच दिवस उरले असून बाजारात सुंदर, लखलखीत आणि विविधरंगी राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. कोरोनातही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी उत्सुक असून नागपुरातून ५ कोटींची उलाढाल होण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रक्षाबंधनाला आता काहीच दिवस उरले असून बाजारात सुंदर, लखलखीत आणि विविधरंगी राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. दुकाने रंगीबेरंगी राख्यांनी सजली आहेत. रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भाऊदेखील भेटवस्तू आणि चॉकलेटच्या दुकानात गर्दी करताना दिसून येत आहेत. नागपूर ही विदर्भाची मुख्य बाजारपेठ आहे. येथून सर्व जिल्ह्यांमध्ये राख्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. बाजारात भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी वाढली आहे. कोरोनातही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी उत्सुक असून नागपुरातून ५ कोटींची उलाढाल होण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
इतवारी, रेशम ओळ, मस्कासाथ, खामला येथील ठोक बाजारात आणि प्रत्येक किरकोळ बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. रेशमाच्या लाल, पिवळा आणि नारंगी अशा भडक रंगांच्या राख्यांना जास्त मागणी आहे. सराफांकडे चांदीच्या राख्यांना मागणी वाढली आहे. लहान आणि मोठे हिरे असलेल्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोलकाता राखी, चंदन राखी, डायमंड व मोती राखी, कुंदन राखी अशा विविध प्रकारच्या राख्या १५ रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेते विकास जैन यांनी सांगितले. काही दुकानांमध्ये राख्या बनविण्याचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून आले. विविधरंगी धाग्यात मणी ओवून आकर्षक राख्या तयार करण्यात येत आहेत. रक्षाबंधन सणातून पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी विविध रोपे आणि झाडांच्या बिया असलेल्या राख्या विक्रीस आल्या आहेत. या राख्या काही दिवसांनी कुंडीत विसर्जित केल्यानंतर काही दिवसातच रोपे तयार होतील.
चॉकलेटला सर्वाधिक मागणी
बाजारात नामांकित कंपन्यांचे चॉकलेट आणि गिफ्ट बॉक्सेस विक्रीस दाखल झाली आहेत. रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला गिफ्ट म्हणून चॉकलेट बॉक्स देतात. स्ट्रॉबेरी, कॅरेमल, ऑरेंज असे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. डेअरी आणि गिफ्टच्या दुकानांमध्ये चॉकलेटचे आकर्षक पॅक १०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
‘कॅट’ने सैनिकांना पाठविल्या १० हजार राख्या
सामाजिक उपक्रमांतर्गत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) देशसेवेचे व्रत घेतलेल्या सीमेवर तैनात सैनिकांसाठी १० हजार राख्या पाठविल्या आहेत. या राख्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिल्लीत सुपूर्द केल्या आहेत.