अधिवेशनाच्या पूर्व संध्येला ईव्हीएम विरोधात रॅली
By कमलेश वानखेडे | Published: December 11, 2024 04:34 PM2024-12-11T16:34:40+5:302024-12-11T16:35:30+5:30
Nagpur : महाविकास आघाडीतील नेते सहभागी होणार
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्व संध्येला १५ डिसेंबर रोजी नागपुरात ईव्हीएम विरोधात रॅली काढली जाणार आहे. दुपारी १२ वाजता महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघून मेडिकल चौकातील राजाबक्षा मैदानावर जाहीर सभेत रुपांतर होऊन समारोप होईल.
इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमतर्फे ही रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीत माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, आ. संजय मेश्राम, खा. श्यामकुमार बर्वे, ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाचे नेते ॲड. महमूद प्राचा, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमच्या राष्ट्रीय समन्वयक ॲड. स्मिता कांबळे आदी सहभागी होतील. लोकशाही व संविधान वाचविण्याच्या या ईव्हीएम विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमचे राष्ट्रीय निमंत्रक प्रितम बुलकुंडे, राष्ट्रीय ऑर्गनायझर ॲड. आकाश मून यांनी केले आहे.
महाविकास आघाडीतर्फे राज्यात विविध भागात ईव्हीएम विरोधात आंदोलने, धरणे सुरू आहेत. महायुती सरकार लोकशाही मार्गाने नव्हे तर ईव्हीएमच्या गैरवापरातून सत्तेवर आले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ईव्हीएम विरोधीत रॅलीत सहभागी होऊन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा मानस आहे.