कर्मचारी संघटनांमध्ये चढाओढ
By admin | Published: April 10, 2016 03:17 AM2016-04-10T03:17:58+5:302016-04-10T03:17:58+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येते.
कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर आक्रमक पवित्रा : कुलगुरुंसमवेत चर्चा, धरणे आंदोलन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन विद्यापीठातील दोन कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्यामध्येच चढाओढ निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेऊन चर्चा केली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघाने विद्यापीठात धरणे आंदोलन करून प्रशासनाला इशारा दिला.
नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेकडून वारंवार प्रशासनाला पत्र पाठविण्यात येत होते. अखेर ६ एप्रिल रोजी कुलगुरुंनी त्यांना चर्चेसाठी वेळ दिला. यावेळी नागपूर विद्यापीठातील रखडलेली पदभरती, विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कऱणे, कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड-पे’ तसेच पदनामातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे, महिलांसाठी कॉमन रुम, धान्य अग्रीममध्ये वाढ करणे इत्यादी बाबींवर चर्चा झाली. कुलगुरूंनी बहुतांश मागण्यांना सकारात्मक उत्तर दिले असल्याची माहिती अध्यक्ष सी.डी.शेळके यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष नरेश कांबळे, मुख्य सचिव राजेश खानोरकर, सचिव प्रदीप मसराम, कोषाध्यक्ष प्रशांत वैद्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)