नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरातील राम गणेश गडकरी स्मृतिस्थळे भग्नावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:46 AM2018-01-23T10:46:37+5:302018-01-23T10:50:40+5:30
‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे.
बाबा टेकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : अल्प आयुष्यात अजरामर साहित्यकृतीद्वारे मराठी साहित्यात राम गणेश गडकरी यांनी सर्वोच्च असे स्थान प्राप्त केले. नाटककार, विनोदकार, कवी म्हणून त्यांनी मराठी साहित्यात छाप पाडली. सावनेरनगरीत त्यांचे काही काळ वास्तव्य होते आणि अखेरचा श्वासही त्यांनी याच भूमीत घेतला. ‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे. केवळ स्मृतिदिनी या स्मृतिस्थळांकडे लक्ष जाते, एरवी स्मारक असो वा समाधीस्थळ की नाट्यगृह... नेहमी त्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर असतो. एवढेच काय तर याच ठिकाणांच्या आड असामाजिक तत्त्वांचाही वावर असतो. ही स्थिती बदलावी, अशी रास्त अपेक्षा साहित्यवर्तुळातून करण्यात येत आहे.
राम गणेश गडकरी यांचे अल्प काळ सावनेरात वास्तव्य होते. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. यापैकी ‘एकच प्याला’ने त्यांना वेगळ्या उंचीवर नेले. यासोबतच ‘वेड्यांचा बाजार’ आणि ‘भावबंधन’ हे अपूर्ण नाटकही त्यांच्या साहित्यकृतीमध्ये आहे. यातील ‘भावबंधन’ हे नाटक नंतर आचार्य अत्रे यांनी पूर्ण केले. केवळ ३४ वर्षे आयुष्य लाभलेल्या राम गणेश गडकरी यांनी २३ जानेवारी १९१९ मध्ये अखेरचा श्वास सावनेरात घेतला. मराठी साहित्यातील त्यांचे स्थान लक्षात घेता स्मृतिस्थळांच्या निर्मितीसाठी दरम्यानच्या काळात हालचाली झाल्या.
ज्या घरात राम गणेश गडकरी यांनी अखेरचा श्वास घेतला, तेसुद्धा मोडकळीस आले. अखेर यासाठी साहित्यप्रेमींनी पुढाकार घेतल्याने पुरातत्त्व विभागाने ती इमारत ताब्यात घेतल्यानंतर स्थिती थोडी सुधारली. त्यांच्या नावाने नाट्यगृह बांधले. मात्र हे नाट्यगृह कधीच सुस्थितीत येऊ शकले नाही. साहित्य चोरी जाणे, खुर्च्यांची मोडतोड झालेली असे प्रकार वाढत गेले. नगर परिषदेने अखेर हालचाल केली आणि आजच्या घडीला नाट्यगृह कसेतरी उभे आहे. कधीतरी या नाट्यगृहात आता कार्यक्रमही होतात. समाधी स्थळावर तर नेहमी कुत्रे, डुकरांचा वावर असतो.
राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी नाट्यगृहाच्या रूपाने प्रयत्न झाला. कै. राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधून त्याचे उद्घाटन ११ डिसेंबर १९८८ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे या नाट्यगृहात अनेक नाटकांचे प्रयोग झाले. मात्र या नाट्यगृहाला हळूहळू अवकळा येण्यास सुरुवात झाली आणि पाहता-पाहता हे नाट्यगृह खंडार बनले. दरम्यानच्या काळात नाट्यगृहाच्या खिडक्या, दारे तर सोडाच खुर्च्या, वीज मीटर, वीज तारा, लोखंडी सळाकी आणि इतर साहित्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. त्यामुळे तेथे केवळ अवशेष उरले होते. एवढेच काय तर याच नाट्यगृहात चोरट्यांची ‘एकच प्याला’ची मैफल भरत असत. याबाबत साहित्यप्रेमींनी पाठपुरावा केला. प्रशासनानेही हालचाली वाढविल्या आणि पाहता - पाहता नाट्यगृह सुस्थितीत आले. तेथे सध्या चौकीदार नेमणुकीस आहे. आता या नाट्यगृहात अधूनमधून कार्यक्रम होतात.