डेरेदाखल होण्याचा राम रहीमचा प्रयत्न नागपूरकरांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:51 AM2017-08-29T00:51:21+5:302017-08-29T00:51:54+5:30

लात्काराच्या आरोपात न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावलेला गुरमित राम रहीम सिंह याने १२ वर्षांपूर्वी .....

Ram Rahim tried to get rid of the rumors of the villagers | डेरेदाखल होण्याचा राम रहीमचा प्रयत्न नागपूरकरांनी उधळला

डेरेदाखल होण्याचा राम रहीमचा प्रयत्न नागपूरकरांनी उधळला

Next
ठळक मुद्दे६०० एकर जागेचा सौदा : महाराष्टÑाच्या सीमेवर टाकणार होता डेरा

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बलात्काराच्या आरोपात न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावलेला गुरमित राम रहीम सिंह याने १२ वर्षांपूर्वी मध्यप्रदेश-छत्तीसगड -महाराष्टÑाच्या सीमेवर डेरा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रायपूर (छत्तीसगड) आणि नागपूरच्या शीख बांधवांनी राम रहीमचा डेरा टाकण्याचा प्रयत्न उधळून लावला. एवढेच नव्हे तर त्याला चोपण्याचाही प्रयत्न केला. मात्र, समर्थकांच्या गराड्यामुळे तो बचावला अन् पळून गेला. त्याच्या समर्थकांची येथील शीख बांधवांनी बेदम धुलाई केली आणि त्याच्या आलिशान कारांचीही तोडफोड केली होती.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेल्या गुरमित राम रहीम सिंह याला एका बलात्कार प्रकरणात न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याच्या अनेक प्रकरणांची देशभर चर्चा सुरू झाली. नागपुरातही काही शीख बांधवांनी (नाव न छापण्याच्या अटीवर) त्याच्या वादग्रस्त प्रकरणांची माहिती सांगून उपरोक्त प्रकरणाचा गौप्यस्फोट केला.
गुरूसर मोदिया गावात १५ आॅगस्ट १९६७ ला जन्मलेल्या

गुरमित राम रहीम सिंह याचे कुटुंबीय डेरा सच्चा सौदाचे निस्सिम अनुयायी होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वयंस्फूर्तीने धावत जाऊन पीडितांना मदत करणे, रक्तदान करणे, यासोबत अनेक सामाजिक कार्यात डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांचा नेहमी प्रशंसनीय सहभाग असायचा. कुटुंबीयांसोबत राम रहीमही त्यात सहभागी व्हायचा. ९० च्या दशकात त्याने डेरा सच्चा सौदाच्या नेतृत्वाची सूत्रे स्वीकारली.
त्यानंतर राम रहीमचे प्रस्थ चांगलेच वाढले. पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थानमध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रभाव निर्माण झाल्यानंतर राम रहीमने २००५ मध्ये मध्यप्रदेश-छत्तीसगड-महाराष्टÑाकडे नजर टाकली. या तीन राज्याच्या सीमेवर बिलासपूरजवळ असलेल्या वैकुंठपूरमध्ये ६०० एकर जमीन विकत घेण्याचा ‘सौदा’ राम रहीम करण्याच्या बेतात होता. तशा हालचाली त्याने सुरू केल्या. या भागात तो डेरेदाखल होणार, असे लक्षात आल्यामुळे या भागातील शीख बांधवांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. त्याच्या वादग्रस्त प्रकरणांची माहिती असल्यामुळे त्याला येथे डेरेदाखल होऊ द्यायचे नाही, असा निर्णय शीख बांधवांनी घेतला. त्यासंबंधाने रीतसर बैठक घेउन त्याला त्याच्या समर्थकांमार्फत विरोधाचा निरोपही देण्यात आला. मात्र, तो निरोप दुर्लक्षित करून ६०० एकर जमिनीचा ‘सौदा’ पक्का करण्यासाठी राम रहीम आपल्या समर्थकांसह ४० कारांचा ताफा घेऊन वैकुंठपूरला पोहोचला. ते कळताच छत्तीसगडच्या शीख बांधवांनी त्याच्याकडे धाव घेतली. मोठ्या प्रमाणात शीख बांधव धावून आल्याचे कळताच राम रहीमने रायपूरकडे धाव घेतली होती.

मध्येच रोखला रस्ता
रायपूरच्या शीख बांधवांनी नागपूरच्या शीख बांधवांना तसा निरोप दिला. त्यानुसार, येथील शीख बांधवांनी मोठ्या संख्येत त्याला मध्येच रोखण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांनी धाव घेतली. नागपूर-भंडारा मार्गावर मौदा गावाजवळ राम रहिमच्या वाहनांचा काफिला येताना दिसताच शीख बांधवांनी रस्ता रोखत समोरच्या वाहनांची तोडफोड केली. त्याच्या समर्थकांनाही चोप दिला. आलिशान वाहनात सशस्त्र रक्षकांच्या गराड्यात बसून असलेल्या राम रहिमला हे कळले. त्यामुळे मागच्या मागे त्याचे अन् साथीदारांची वाहने वळली अन् मधल्या भागातून तो पळून गेला. ज्या वाहनांची तोडफोड केली, त्यात राम रहीम नव्हता, तो पळून गेल्याचे ध्यानात येताच येथील शीख बांधवांनी परत रायपूर आणि अन्य काही ठिकाणच्या शीख बांधवांना ही माहिती दिली. त्यानंतर ठिकठिकाणी ‘मौदा स्टाईल’ विरोध झाला. परंतु मध्ये कुणाच्या हाती न लागता राम रहीम इटारसीहून पंजाबमध्ये पळून गेल्याचे वृत्त आले.

मौदा ठाण्यात झाली होती नोंद
त्यानंतर राम रहिमने त्या ६०० एकर जमिनीचा नाद सोडला अन् इकडे डेरेदाखल होण्याचाही नाद सोडल्याचे गुरुद्वारा कमिटीच्या एका उच्चपदस्थ शीख बांधवाने लोकमतला सांगितले. दरम्यान, मौद्याला शीख बांधवांनी ज्या समर्थकांना चोपले होते, त्यांच्यातील काही जणांनी तक्रार दाखल करण्यासाठी मौदा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, संतप्त जमाव पोलीस ठाण्याकडे येत असल्याची माहिती कळताच ही मंडळी तेथून पळून गेली होती. तशी नोंद त्यावेळी मौदा ठाण्यात करण्यात आली होती. आज राम रहिमला कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे त्याच्या या डेरेदाखल होण्याच्या प्रयत्नांची माहिती पुन्हा एकदा चर्चेला आली.

Web Title: Ram Rahim tried to get rid of the rumors of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.