आशा बगे यांना ‘राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:19 AM2018-03-15T10:19:46+5:302018-03-15T10:21:33+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे प्रथमच दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार प्रख्यात लेखिका आशा बगे यांना जाहीर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे प्रथमच दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार प्रख्यात लेखिका आशा बगे यांना जाहीर झाला आहे. विदर्भ साहित्य संघाचे व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या आणि आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
त्यांना हा पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. स्त्रीकेंद्री जाणिवेच्या प्रभावी लेखिका अशी आशा बगे यांची ओळख आहे. परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत त्यांनी सुमारे चार दशके कथा, कांदबरी, ललित असे चौफेर लेखन केले आहे. २००६ साली त्यांच्या भूमी या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांचे हे योगदान डोळ्यापुढे ठेवून महामंडळाने त्यांना या पुरस्कारासाठी निवडले आहे.