राम मंदिरसाठी मोदी सरकारवर दबाव आणणार
By admin | Published: December 27, 2016 02:59 AM2016-12-27T02:59:44+5:302016-12-27T02:59:44+5:30
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला
विहिंप आक्रमक : नागपुरात अधिवेशनाला सुरुवात
नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला या सरकारने बासनात गुंडाळले असल्याचे हिदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. हा विषय पुन्हा तापवून मोदी सरकारवर दबाव आणण्याची रणनीती विश्व हिंदू परिषदेने आखली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नागपुरात आजपासून सुरू झालेल्या विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.
विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. हे अधिवेशन एक आठवडा चालणार असून, पहिल्या टप्प्यातील बैठकीला कापसी येथील माँ उमिया धाम परिसरात सुरुवात झाली आहे. उद्घाटन सत्राला विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. विहिंपची ही अंतर्गत बैठक असल्याने यापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते.भाजप गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या वेळी अयोध्येत राम मंंदिर उभारण्याचे आश्वासन देत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले असून, दोन वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु राम मंदिर उभारण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली सुरू नाही. राम मंदिराच्या मुद्याला बगल दिल्याने देशभरातील साधू-संत भाजप सरकारवर नाराज आहेत. यावर अधिवेशनात चर्चा घडवून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विहिंप व्यूहरचना आखणार आहे.
दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २७ ते २९ डिसेंबरदरम्यान खुले अधिवेशन होणार आहे. यात ३५ देशांतील ४४ प्रांतातील ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापूर्वीचे अधिवेशन हरिद्वार, काशी, मथुरा व दिल्ली आदी ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. नागपुरात प्रथमच अशा स्वरूपाचे भव्य अधिवेशन होत आहे.
विहिंपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातसह अन्य काही राज्यांत गोवंश संरक्षण कायदा करण्यात आला आहे. परंतु कत्तलखान्यात जाणारे गोवंश पकडल्यानतंर त्यांचे पुनर्वसन कोठे आणि कसे करावे, याचा खर्च कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा गोवंशाचे पालन करण्याची क्षमता देशभरातील गोशाळांत नाही. त्यामुळे गोवंशाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर मंथन
रेशीमबाग येथे पार पडलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभात हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत विहिंप नेतेसुद्धा गंभीर आहेत. यावर तोडगा काढण्यासंदर्भात अधिवेशनात मंथन होणार आहे. तसेच संघटनात्मक मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.