अयोध्येत राममंदिर होणारच ; सरसंघचालकांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:21 PM2019-01-02T21:21:55+5:302019-01-02T21:22:47+5:30
अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात येईल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संघ परिवारात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र अयोध्येत राममंदिर होईल व लवकरच उभारणीला सुरुवात होईल असे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी ठासून सांगितले. उपराजधानीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात येईल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संघ परिवारात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र अयोध्येत राममंदिर होईल व लवकरच उभारणीला सुरुवात होईल असे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी ठासून सांगितले. उपराजधानीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
अयोध्येत राममंदिर व्हावे ही प्रभू श्रीरामाचीच इच्छा आहे. हे मंदिर लवकरात लवकर व्हावे ही आमची भूमिका आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मुलाखतीत राममंदिर उभारणीसंदर्भात कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधानांनी राममंदिर होणार नाही असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन प्रकियेनंतर विचार करू असे म्हटले. मंदिराचा मुद्दा हा ६९ वर्षांअगोदरचा आहे. मंदिर उभारणीला फार वेळ झाला आहे. मात्र आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण वेळ कधीही बदलू शकते, असे सूचक विधान त्यांनी केले.
भय्याजींची भूमिका योग्यच
संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राममंदिर उभारणीबाबत संघ ठाम असल्याचे वक्तव्य मंगळवारी नागपुरात केले होते. तर सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ‘ट्विट’च्या माध्यमातून पंतप्रधानांचे वक्तव्य सकारात्मक असून या सरकारच्या कार्यकाळात निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता होईल अशी जनतेची अपेक्षा असल्याची भूमिका मांडली होती. यावर सरसंघचालकांना विचारणा केली असता होसबळे हे सहसरकार्यवाह आहेत, भय्याजी जोशी हे सरकार्यवाह आहेत आणि मी सरसंघचालक आहे. त्यामुळे भय्याजींनी मांडलेली भूमिका योग्य असून तीच माझीही भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.