रमाबाई रानडे स्मृती पुरस्काराचा नागपुरातून शुभारंभ
By Admin | Published: September 5, 2015 03:17 AM2015-09-05T03:17:42+5:302015-09-05T03:17:42+5:30
स्त्रियांसाठी रमाबाई रानडे यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यामुळे सेवासदन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ....
कांचन गडकरी : सेवासदन संस्थेच्या वर्धापनदिनी प्रदान करणार
नागपूर : स्त्रियांसाठी रमाबाई रानडे यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यामुळे सेवासदन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त २ जानेवारी २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रमाबाई रानडे स्मृती ‘शिक्षण प्रबोधन पुरस्कार २०१६’ प्रदान करण्यात येईल, अशी माहिती सेवासदन संस्थेच्या माजी अध्यक्ष कांचन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कांचन गडकरी म्हणाल्या, हा पुरस्कार विदर्भस्तरीय असून ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शैक्षणिक वातावरण नसलेल्या भागात शैक्षणिक वातावरण निर्माण करणारी व्यक्ती किंवा संस्था, शारीरिक-मानसिक दुर्बल घटकांसाठी कार्य करणारी व्यक्ती किंवा संस्था, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी व्यक्ती किंवा संस्था, सामाजिक उपक्रमाद्वारे लोकाभिमुख व संस्कारक्षम शिक्षण-प्रबोधन करणारी व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येईल.
पुरस्कारासाठी अर्ज सादर करताना कार्याध्यक्ष, सचिव रमाबाई रानडे स्मृती ‘शिक्षण-प्रबोधन पुरस्कार २०१६’ समिती या नावाने १६ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्जदाराने आपल्या कार्याची सविस्तर माहिती लिखित स्वरूपात सादर करावी.
समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव सुचवू शकतात. पुरस्काराचे अर्ज संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान उपलब्ध राहतील.
अधिक माहितीसाठी पुणे सेवासदन संस्था, उत्तर अंबाझरी मार्ग, सीताबर्डी येथे संपर्क साधण्याचे आवाहन कांचन गडकरी यांनी केले. पत्रकार परिषदेला बापू भागवत, संस्थेचे सचिव अरुण आदमने उपस्थित होते. (प्रतिनिधी)