दीक्षाभूमीहून निघाली रमाई संदेश यात्रा
By आनंद डेकाटे | Published: May 10, 2023 06:57 PM2023-05-10T18:57:11+5:302023-05-10T18:57:51+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी स्त्री भूषण रमाई आंबेडकर यांच्या जीवन-कार्याचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीने यंदाही रमाई संदेश यात्रा काढण्यात आलेली आहे.
आनंद डेकाटे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी स्त्री भूषण रमाई आंबेडकर यांच्या जीवन-कार्याचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीने यंदाही रमाई संदेश यात्रा काढण्यात आलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजकुमार वंजारी यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा नागपुरातून रवाना झाली.
या यात्रेचा प्रारंभ पवित्र दीक्षाभूमी येथून तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आला. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमिचे सचिव डा. सुधीर फुलझेले, सदस्य भदंत नागदीपांकर, सदस्य विलास गजघाटे, वरिष्ठ पत्रकार-सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक यांच्या हस्ते पंचशील ध्वज दाखवून यात्रेस रवाना करण्यात आले, या वेळी त्यांनी आपल्या भाषणातून रमाई संदेश यात्रा या उपक्रमाचे स्वागत करून सर्व यात्रेकरू कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
ही रमाई संदेश यात्रा डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घडामोडीतील स्थळांना भेटी देत रमाईंचे जन्मगाव वणंद (जिल्हा रत्नागिरी) येथे जाणार असून तिथे रमाईंना अभिवादन करण्यात येणार आहे. यात्रे दरम्यान वाटेत ठिकठिकाणी रमाईंच्या जीवन – कार्य -विचारांचा जागर संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.
या यात्रेत सामाजिक कार्यकर्ते हरिदास बेलेकर, अश्विन पिल्लेवार, चंद्रशेखर भटकर, दिलीप सोनडवले, वंदना निकोसे, सुमित्रा सुखदेवे, आशा मेश्राम, अनिता मेंढें,सीमा मेश्राम, बबिता भोवते,मधुकर निकोसे,शकुंतला सोनडवले यांच्यासह 28 कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत.