समाजावर संस्कार करते रामकथा
By admin | Published: January 12, 2016 03:24 AM2016-01-12T03:24:47+5:302016-01-12T03:24:47+5:30
संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले.
विजय कौशल महाराज : रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरुवात
नागपूर : संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले.
श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीतर्फे काटोल रोडवरील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. महोत्सवात बोलताना विजय कौशल महाराज यांनी रामकथेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, भगवान शिव हे देवी पार्वती यांना रामकथा सांगण्यापूर्वी त्यामागची भूमिका स्पष्ट करतात. या भूमिकेपासून रामकथेला सुरुवात होते. भगवान शिव हे पार्वतीला म्हणतात, देवी तूने समाजासाठी कल्याणकारी व पवित्र रामकथा ऐकविण्याचा आग्रह केला आहे. यामुळे तुझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नाही. देव निर्गुण व निराकार आहे किंवा तो न निर्गुण आहे न निराकार. नास्तिक लोक देवाचे अस्तित्व व त्यांच्या भक्तीवर नाना टीका करतात. देवाला नैवेद्य का ठेवायचा, मूर्तीची पूजा कशाला करायची, देव बोलत का नाही असे प्रश्न विचारले जातात. वास्तविक देव तोच आहे, जो भक्ताच्या मनात असलेल्या रूपात प्रगट होतो. भक्तासाठी देव नोकर, मित्र, सहकारी यासह कित्येक विविध रूपात प्रगट झाले आहेत. अशा अनेक घटना भक्तांच्या जीवनचरित्रांमध्ये आहेत.
यापुढे महाराजांनी सांगितले की, पतीने स्वत:च्या पत्नीपासून काहीच लपवायला नको. पत्नीशी लपवाछपवी खाईत जाण्यासारखे आहे. पत्नीला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे.
याप्रसंगी प्रामुख्याने महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने, समितीचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित, गोविंदलाल अग्रवाल, पोद्दारेश्वर राममंदिरचे विश्वस्त प्रदीप अग्रवाल, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे, प्रा. निरंजन देशकर, विहिंपचे अजय निलदावार, प्रदीप सिंह, समाजसेवक जयप्रकाश गुप्ता, मुन्ना महाजन, श्रीकांत देशपांडे, राजेंद्र पुरोहित उपस्थित होते. रामकथा १८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कथेची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत आहे.(प्रतिनिधी)