रामभाऊ इंगोले यांना तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार : नागपूर विद्यापीठाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 10:47 PM2019-08-02T22:47:22+5:302019-08-03T00:22:07+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९६ वा वर्धापनदिन ४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने समाजसेवक रामभाऊ इंगोले यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वारांगनांच्या अपत्यांना शिक्षित करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी इंगोले यांनी आयुष्य वेचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९६ वा वर्धापनदिन ४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने समाजसेवक रामभाऊ इंगोले यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वारांगनांच्या अपत्यांना शिक्षित करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी इंगोले यांनी आयुष्य वेचले आहे.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा.भूषण पटवर्धन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे असतील. कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार तसेच इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदापासून विद्यापीठातर्फे प्राचार्य बलराज अहेर स्मृती आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सुवर्णपदकदेखील देण्यात येणार आहे. वित्त व लेखा विभागाच्या उपकुलसचिव अर्चना भोयर यांना या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येईल.
विद्यापीठाच्या ९६ व्या वर्धापनदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधन पुरस्कारसमवेतच आदर्श विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची कुलगुरू डॉ.काणे यांनी सोमवारी घोषणा केली.
आदर्श पुरस्कार यादी
आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार -अमर सेवा मंडळ
आदर्श अधिकारी पुरस्कार -प्रवीण गोतमारे (उद्यान अधीक्षक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)
आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार
- सुनील इंगळे(उच्च श्रेणी लिपीक, सांख्यिकी शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)
- राजेंद्र पाठक (उच्च श्रेणी लिपीक, पुनर्मूल्यांकन शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)
- अरुण नेवारे (वित्त व लेखा विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)
- पंकज हेमनानी (लिपीक, राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालय, जरिपटका)
- दिलीप खडसे (यशवंत महाविद्यालय, सेलू, जि.वर्धा)
उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार
- निरंत पारडीकर (जे.डी.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, काटोल मार्ग)
- फ्रॅक ग्रीगरी स्टॅनले बार्टन (शासकीय विज्ञान संस्था)
- काजल अहाके(राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालय)
- आरोही वडलकर (शासकीय विज्ञान संस्था )
विशेष सन्मान
श्वेता उमरे (शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था)
लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ ९५ अर्जच
एरवी कुठलेही सन्मान किंवा पुरस्कार मिळाला की विद्यार्थ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा व नवा उत्साह मिळतो. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नेमके विरुद्ध चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विद्यापीठाने शैक्षणिक व अभ्यासेतर विविध उपक्रमात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. याकरिता महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आली होती व विद्यार्थ्यांना याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ ९५ विद्यार्थ्यांचेच अर्ज आले होते. इतक्या कमी प्रमाणात अर्ज येण्यामागे महाविद्यालये व विद्यार्थ्यांची अनास्था आहे की विद्यापीठ प्रशासनालाच विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात अपयश आले असा प्रश्न निर्माण झाला आहे. .
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर कुठल्या पुरस्काराची अपेक्षाही केली नव्हती आणि मनात विचारही केला नव्हता. विद्यापीठासारख्या बुद्धिवंतांच्या क्षेत्राकडून माझ्या कामाची दखल घेतली जावी, याचा अतिशय आनंद झाला आहे. यामुळे आता समाजही आपल्या कामाला उचलून धरेल, याचा विश्वास वाटतो आहे. विद्यापीठाकडून पुरस्काराबाबत समजले तेव्हा आपल्या हातून विशेष काय घडले, हा विचार मनात येतो. इतक्या वर्षाच्या प्रवासाचा विचार करताना मनुष्य या नात्याने मनुष्य जातीचे कर्तव्य निभावाले याचे समाधान आहे, एवढेच मला म्हणावेसे वाटते.
रामभाऊ इंगोले, सामाजिक कार्यकर्ते