खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:09+5:302021-04-09T04:09:09+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचे संकट गडद झाले असताना कोरोनाचा गंभीर रुग्णांवरील उपचारात प्रभावी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पडला ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचे संकट गडद झाले असताना कोरोनाचा गंभीर रुग्णांवरील उपचारात प्रभावी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पडला आहे. गुरुवारी सकाळी शासकीय व खासगी कोविड रुग्णालये मिळून ७,१७६ रेमडेसिवीर उपलब्ध होते. त्या तुलनेत १०,३७७ रुग्ण भरती असल्याने दुपारनंतर अनेक खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा ठणठणाट पडला होता. अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळाले नसल्याची माहिती आहे. अन्न व औषध प्रशासनानुसार (एफडीए) १० ते १४ एप्रिल दरम्यान इंजेक्शनचा साठा येणार आहे. तोपर्यंत काय?, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप पहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना प्रशासनाने ना कोविड बेडचे नियोजन केले ना, औषधोपचाराचे. परिणामी, याचा सर्वाधिक फटका सामान्य व गरीब रुग्णांना बसताना दिसून येत आहे. दुसरी लाट अधिक तीव्र असणार, दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असतानाही रेमडेसिवीरसारख्या आवश्यक इंजेक्शनचासाठा करून ठेवण्यास प्रशासनाचे प्रयत्न कमी पडले आहे. ‘एफडीए’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मेयो, मेडिकल, एम्स, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन, लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा व सीताबर्डी व शालिनीताई मेघे हॉस्पिटल हे आठ रुग्णालये मिळून बुधवारी सकाळी केवळ ३३४९ तर, ६७ खासगी कोविड रुग्णालय मिळून ३८२७ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होते. परंतु शासकीय रुग्णालयात १५६९ तर खासगीमध्ये ८,८०८ रुग्ण उपचाराखाली असल्याने अनेक रुग्णालयात दुपारनंतर इंजेक्शनच उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्ण अडचणीत आले होते.
-काळ्या बाजारात ८ ते १० हजारांची लस
खासगी रुग्णालयात व केमिस्ट दुकानांमध्ये विविध कंपन्यांचे ९०० ते ३ हजार रुपयांपर्यंत मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन गुरुवारी काळ्या बाजारात ८ ते १० हजार रुपयांत विकत घेण्याची वेळ काही रुग्णांच्या नातेवाइकांवर आली. परंतु तक्रार नसल्याने कोणावरच कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे, या इंजेक्शनचे दर शासनाने निश्चित केले नाही. परिणामी, अव्वाच्या सव्वा किमतीत ते विकले जात असल्याचे एका केमिस्टने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
-१० ते १४ एप्रिल दरम्यान डोस मिळणार
राज्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पडला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ७ कंपन्यांना लेखी पत्र देऊन इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १० ते १४ एप्रिल दरम्यान प्रतिदिन २२ हजार इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. १० ते ३० एप्रिल दरम्यान ३६ लाख ४० हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहे.
डॉ. पुष्पाहास बल्लाळ
सहआयुक्त एफडीए, नागपूर
::७ शासकीय रुग्णालये मिळून १५६९ रुग्ण : ३३४९ रेमडेसिवीर
:: ६७ खासगी रुग्णालये मिळून ८,८०८ रुग्ण : ३८२७ रेमडेसिवीर
(गुरुवार सकाळपर्यंतची माहिती.)