‘रामझुला-२’ नवीन वर्षात नागपूरकरांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:26 AM2018-11-06T10:26:56+5:302018-11-06T10:29:56+5:30
येत्या नवीन वर्षात रामझुला पार्ट दोन नागपूरकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोद्दारेश्वर राम मंदिर ते जयस्तंभ चौक दरम्यान रेल्वे स्टेशनच्या रुळावर बनत असलेला केबल आधारित रेल्वे ओव्हरब्रिज ‘रामझुला’च्या पहिल्या भागाचे काम पूर्ण व्हायला आठ वर्षे लागली. परंतु याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम मात्र आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. केवळ स्ट्रीट लाईट, जाळी, केबल प्रोटेक्शन आदी कामे शिल्लक आहेत. ही कामे दीड ते दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात रामझुला पार्ट दोन नागपूरकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केंद्र आणि राज्य सरकार तसेच मनपाच्या आर्थिक सहकार्याने केबल आधारित रामझुला प्रोजेक्ट साकारण्यात येत आहे. या कामाचे कंत्राट एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. रामझुला प्रोजेक्टचे वर्कआॅर्डर २५ जानेवारी २००६ रोजी देण्यात आले होते. हे काम दोन वर्षात पूर्ण करावयाचे हेते. परंतु तसे झाले नाही.
अगोदर लागले आठ वर्ष, आता चार वर्षात काम
रामझुला भाग १ चे काम पूर्ण व्हायला तब्बल आठ वर्षे लागली. याचे अनेक कारणेही होती. कधी रेल्वेने रामझुल्याच्या डिझाईनवरून बाधा निर्माण केली तर कधी ठेकेदार कंपनीतर्फे खर्च वाढवण्याची मागणी करीत काम रोखण्यात आले. या सर्वांमध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ७ डिसेंबर २०१४ ला शक्य होऊ शकले. परंतु दुसऱ्या टप्प्याचे काम मात्र रेकॉर्ड ४ वर्षात होतांना दिसून येत आहे. यातही जुना पूल तोडण्यातच सहा महिन्याचा कालावधी लागला.
स्ट्रीट लाईट, जाळी, केबल प्रोटेक्शनचे काम शिल्लक
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारिक सूत्रानुसार रामझुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. केवळ स्ट्रीट लाईट, जाळी, केबल प्रोटेक्शन लावण्याचे काम शिल्लक आहे. रामझुल्याच्या फूटपाथच्या देन्ही बाजूला जाळी लावण्यात येत आहे. पाईप, ड्रेनेज सिस्टीमही लावायची आहे. ही सर्व कामे दीड ते दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जपानवरून आलेत केबल
रामझुलासाठी विशेष प्रकारचे मोम मिश्रित केबल पूर्वी दक्षिण आफ्रिकेतून मागवण्यात आले होते. यासाठी केबलची फटिक टेस्टही करण्यात आली होती. परंतु पुढे संबंधित कंपनीत आग लागल्याने कंपनी वेळेत केबलचे आॅर्डर पूर्ण करण्याच्या स्थितीत नव्हती. अशा वेळी जपानवरून केबल मागवण्यात आले.