रामलल्ला २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रवेश करेल; मोहन भागवतांनी देशाचा विकास सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 09:45 AM2023-10-24T09:45:54+5:302023-10-24T09:46:13+5:30
Mohan Bhagwat Speech On RSS Dasara Nagpur 2023: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरुवात झाली.
भारताचा गौरव दरवर्षी वाढतच चालला आहे. जसे की जी २० परिषद इथे झाली. ती तर दरवर्षीच होते. परंतू, इथे झाले ते महत्वाचे होते. त्या परिषदेत भारतीयांच्या आदरातिथ्याची प्रशंसा झाली. विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा गौरव केला, तसेच आमच्या स्वप्नांचे उड्डाण जगभरातल्या लोकांनी पाहिले, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. याचबरोबर भागवत यांनी रामलल्ला अयोध्येच्या मंदिरात २२ जानेवारीला प्रवेश करेल, अशी घोषणाही केली.
आशियाई खेळांतही आपल्या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर पदके पटकावली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा गरीबांच्या कल्याणासाठी वापर केला गेला. स्टार्टअपमध्ये क्रांती झाली. संरक्षण असेल की कृषी सर्वच क्षेत्रात प्रगती पाहिली आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. दहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आलो आहोत, असे भागवत म्हणाले.
आमचे राष्ट्रीय आदर्श भगवान राम यांचे मंदिर अयोध्येत बनत आहे. रामांचे बालस्वरुप या मंदिरात २२ जानेवारीला प्रवेश करेल. तिथे आपण तेव्हा जाऊ शकणार नाही. सुरक्षेचा विषय असेल. तेथील व्यवस्थांचा मुद्दा असेल. हळूहळू आपापल्या वेळेनुसार तिकडे जाऊ, असे भागवत म्हणाले.
आपल्या आदर्श जीवनातून संपूर्ण जगाला अहिंसा, करुणा आणि नैतिकतेचा मार्ग दाखविणाऱ्या महावीर स्वामींचे २५५० वे निर्वाण वर्ष आपण साजरे करत आहोत. आपल्या तरुणपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना जागृत करणारे तमिळ संत श्रीमद रामलिंग वल्लार यांच्या 200 व्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम आम्ही नुकताच साजरा केला. गरिबांना अन्नदान करण्यासाठी त्यांनी पेटवलेली चूल आजही तामिळनाडूत जळत आहे, असे भागवत म्हणाले.
या वर्षी कोल्हापूरचे (महाराष्ट्र) राज्यकर्ते छत्रपती शाहूजी महाराज यांची 150 वी जयंती देखील साजरी केली जात आहे. कल्याणकारी आणि प्रशासकीय चतुराईने आपले जीवन सामाजिक विषमता दूर करण्यासाठी समर्पित केले, असेही भागवत म्हणाले.