रामनामाचा गजर
By admin | Published: April 16, 2016 02:43 AM2016-04-16T02:43:05+5:302016-04-16T02:43:05+5:30
पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूर दुमदुमले.
श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमले पश्चिम नागपूर
नागपूर : पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूर दुमदुमले. रामनगरातील राममंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आरती आणि पालखी पूजन झाल्यानंतर शोभायात्रेची सुरुवात झाली. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अभिजित मुजुमदार, अॅड आनंद परचुरे यांची उपस्थिती होती. राम मंदिरापासून प्रवेशद्वारापर्यंत भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
चित्ररथांनी वेधले लक्ष
पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील भव्य आणि आकर्षक चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधले. शोभायात्रेत अकरामुखी हनुमंताचे विराट रूप, भगवान शंकराचे अमरनाथ दर्शन, श्री साईबाबा दर्शन, बाळ श्रीकृष्णाला गणपती लाडू देताना, श्रीरामचंद्र दर्शन, कामदेवातर्फे शिवजींची तपस्या भंग, चंडिका दर्शन, तिरुपती बालाजी, जय मल्हार खंडोबा दर्शन, पंचमुखी श्री हनुमान दर्शन, श्री रामरथ, पंचमुखी श्री हनुमान दर्शन, श्री साईबाबा दर्शन, गरुड अवतार, माता पार्वतीद्वारा शिवलिंग पूजन, श्री कालीमाता दर्शन, श्रीराम भक्त हनुमान, दगडुशेठ गणपती दर्शन, हनुमान प्रभु श्रीरामचंद्राची आराधना करताना, आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजींना तलवार देताना, हनुमान श्रीराम, लक्ष्मण यांना घेऊन जाताना, भगवान विष्णूंना अवतार घेण्यासाठी सर्व देवातर्फे प्रार्थना करताना, सुरसेच्या मुखातून हनुमान बाहेर निघताना, कुंभकर्ण वध, श्रीराधाकृष्ण लीला या चित्ररथांनी भाविकांचे लक्ष वेधले. असंख्य नागरिक आपल्या कुटुंबीयांसह शोभायात्रेतील चित्ररथ पाहण्यासाठी उपस्थित होते.
शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
श्रीराम मंदिरातून शोभायात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर मार्गात विविध संस्था संघटनांतर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रा बाजीप्रभू चौक, लक्ष्मीभवन चौक, कॉफी हाऊस चौक, झेंडा चौक, लक्ष्मीनारायण मंदिर चौक, बटुकभाई चौक, शंकरनगर चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक, अभ्यंकरनगर चौक, व्हीएनआयटी गेट, एलएडी कॉलेज, कार्पोरेशन शाळा, हिल रोड, या मार्गाने श्रीराम मंदिरात पोहोचली. शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी विविध चौकात कमानी उभारण्यात येऊन नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.