कोराडीतील रामनाथ सिटी प्रकरण : हुडकोची ६५ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:47 PM2021-04-01T23:47:34+5:302021-04-01T23:49:40+5:30
65 crore cheated of HUDCO हुडकाे (हाऊसिंग ॲण्ड अर्बन डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमिटेड) कडून कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता या संस्थेची तब्बल ६५ काेटी १४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात काेराडी (ता. कामठी) पाेलिसांनी रामनाथ डेव्हलपर्सच्या दाेन संचालकांविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : हुडकाे (हाऊसिंग ॲण्ड अर्बन डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमिटेड) कडून कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता या संस्थेची तब्बल ६५ काेटी १४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात काेराडी (ता. कामठी) पाेलिसांनी रामनाथ डेव्हलपर्सच्या दाेन संचालकांविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.
आराेपींमध्ये सुरेशचंद्र गुप्ता, रा. मार्तंड छाया अपार्टमेंट, शिवाजीनगर, नागपूर व त्यांचे बंधू संदेशचंद्र गुप्ता, रा. सिव्हिल लाइन, झाशी (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. गुप्ता बंधू रामनाथ डेव्हलपर्सचे संचालक असून, त्यांनी काेराडी येथे रामनाथ सिटीचे निर्माण कार्य केले आहे. या याेजनेसाठी त्यांनी हुडकाेकडून सन २००९ मध्ये ३० काेटी रुपयांचे कर्ज घेतले हाेते. या कर्जाची परतफेड सुकर व्हावी म्हणून हुडकाेने त्यांना कर्ज परतफेडीचे हप्ते पाडून दिले हाेते.
गुप्ता बंधूंनी या कर्जाच्या हप्त्यांचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांचे कर्जखाते दिवाळखाेरीत (एनएपी-नाॅन परफाॅर्मिंग ॲसेट) गेले. त्यातच त्यांच्याकडे मूळ कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्यास असे एकूण ६५ काेटी १४ लाख ३८ हजार रुपये थकीत राहिले. वारंवार सूचना देऊनही कर्जाच्या रकमेचा भरणा केला जात नसल्याने हुडकाेने हे कर्ज प्रकरण प्राधिकरणाकडे दाखल केले हाेते. शिवाय, या प्रकरणात फसवणूक केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडेही करण्यात आली हाेती. मात्र, प्रकरण प्राधिकरणात न्यायप्रविष्ट असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने या तक्रारीवर काेणतीही कारवाई केली नाही.
दरम्यान, सन २०१६ मध्ये रामनाथ सिटीत राहणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुप्ता बंधूंच्या विराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. आर्थिक गुन्हे शाखा काेणतीही कारवाई करीत नसल्याने हुडकाेने शेवटी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार हुडकाेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर (लाॅ) त्रिप्ती दीक्षित (४५, रा. मुंबई) यांनी नुकतीच काेराडी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. या तक्रारीच्या आधारे काेराडी पाेलिसांनी गुप्ता बंधूंच्या विराेधात भादंवि ४०६, ४२०, १२०, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक राजेश पुकळे करीत आहेत.