श्रीराम ध्वज व अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री; होणार २०० कोटींचा व्यवसाय
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 11, 2024 08:14 PM2024-01-11T20:14:58+5:302024-01-11T20:16:05+5:30
- झेंडे, दुपट्टे, तोरण लायटिंग, बिल्ले, बॅच, टी-शर्ट, टोपी व अन्य साहित्यांना प्रचंड मागणी : नागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यात विक्री
नागपूर : अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या शुभप्रसंगी संपूर्ण देशात वातावरण राममय झाले आहे. नागपुरात श्रीरामाची प्रतिमा असलेले झेंडे, दुपट्टे, तोरण, लायटिंग, बिल्ले, टोपी, टी-शर्ट आदींसह अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री होत आहे. इतवारी येथील १०० हून अधिक दुकानदार विक्री करीत आहे. नागपुरात हा व्यवसाय २०० कोटींहून अधिक होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
प्रचंड मागणीमुळे होऊ लागला साहित्यांचा तुटवडा
धार्मिक साहित्यांचे वितरक व विक्रेते लिलारिया अॅण्ड सन्सचे गिरीश लिलारिया म्हणाले, गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘घर घर तिरंगा’ अशा आवाहनानंतर संपूर्ण देशात तिरंगा झेंड्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. यंदा श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने श्रीरामाच्या छायाचित्रांर्च्या साहित्यांची दुपटीने विक्री होत आहे. मागणीमुळे किरकोळ दुकानदारांनी ऑर्डर बुक केले आहेत. भिवंडी येथून कपडा येतो तर अहमदाबादला प्रिंंटिंग होते. कटिंग आणि सिलाई नागपुरात होत आहे. त्यानंतर हे धार्मिक साहित्य संपूर्ण महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये पाठविण्यात येत आहे. दरदिवशी ऑर्डर वाढत असून पुरवठा करणे अशक्य झाले आहे.
श्रीराम ध्वज आणि दुपट्ट्याला सर्वाधिक मागणी
घरोघरी श्रीरामाचे ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार बहुतांश नागरिक घरावर श्रीराम ध्वज लावत आहेत. शिवाय तोरण आणि पताकाची विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय २२ जानेवारीला श्रीरामाचे चित्र असलेले गळ्यातील दुपट्टे आणि वाहनांवर लावण्यासाठी झेंड्याची खरेदी करीत आहे. अनेकांनी श्रीरामाची प्रतिमा असलेले टी-शर्ट खरेदी केले आहेत.
प्राणप्रतिष्ठेचा मकरसंक्रातीच्या व्यवसायावर परिणाम
नागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना या राज्यांमध्ये साहित्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. निर्मितीही वेगात सुरू असल्याचे इतवारीतील वितरक आणि विक्रेत्यांनी सांगितले. धार्मिक साहित्यांच्या विक्रीचा मकरसंक्रातीच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मकरसंक्रातीच्या व्यवसायात ३० ते ४० टक्के घसरण झाल्याचे दिसून येत आहे. भेटस्वरुपात देण्यात येणाऱ्या भांड्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
साहित्य विक्री दर (रुपये) :
राम, हनुमान दुपट्टे ९ ते १५०
तोरण पताका २५ रु. पॅकेट
लायटिंग ४५ ते १५० रू. पॅकेट
बॅच व बिल्ले ५ ते २० नग
टोपी ५ ते २० नग
टी-शर्ट ८० ते १५० नग
वाहनाचे झेंडे १५ नग
गेल्यावर्षी तिरंगा झेंडा तर यंदा श्रीराम ध्वज व संबंधित साहित्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. मागणीमुळे बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. कपडा आणि प्रिंट बाहेरून झाल्यानंतर नागपुरात कटिंग आणि सिलाई होत आहे. येथून नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना राज्यात पुरवठा होत आहे. नागपुरात १०० हून अधिक विक्रेते विक्री करीत आहेत.
गिरीश लिलारिया, साहित्यांचे वितरक व विक्रेते.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) संपूर्ण देशात श्रीरामाचे ध्वज आणि अन्य साहित्यांचे नि:शुल्क वाटप करीत आहे. या निमित्ताने देशात ५० हजार कोटींचा व्यवसाय होणार आहे. नागपुरात १ लाखाचे साहित्य रॅलीद्वारे जनजागृती करून वाटप करीत आहे. व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. २२ जानेवारी हा दिवस दरवर्षी श्रीरामाचा जन्मदिन म्हणून साजरा होणार आहे.
बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘कॅट’