चाकूच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्या गुंडावर नागपुरात संतप्त जमावाची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 08:16 PM2019-07-06T20:16:40+5:302019-07-06T20:30:49+5:30

रात्रीच्या वेळी किराणा दुकानावर कब्जा करून भल्या सकाळी दुकानदारावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गुंडाला परिसरातील नागरिकांनी संघटितपणे प्रत्युत्तर दिले. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी धाव घेतल्यामुळे हातात चाकू घेऊन दहशत पसरविणारा गुंड सुसाट पळून गेला. तर, आपल्या गुंड मुलाचा बचाव करण्यासाठी आलेल्या गुंडाच्या वडिलाला संतप्त जमावाने बेदम चोप दिला. नंतर त्याचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. सक्करदरातील भांडेप्लॉट चौकात शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.

Rampaged mob attacked on goon who created terror on the tip off knife in Nagpur, | चाकूच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्या गुंडावर नागपुरात संतप्त जमावाची धाव

चाकूच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्या गुंडावर नागपुरात संतप्त जमावाची धाव

Next
ठळक मुद्देनागरिकांचा संघटितपणा, प्रशासनाची साथसुसाट पळाला गुंड गुंडाचे अतिक्रमण जमीनदोस्त : भांडेप्लॉट चौकात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीच्या वेळी किराणा दुकानावर कब्जा करून भल्या सकाळी दुकानदारावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गुंडाला परिसरातील नागरिकांनी संघटितपणे प्रत्युत्तर दिले. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी धाव घेतल्यामुळे हातात चाकू घेऊन दहशत पसरविणारा गुंड सुसाट पळून गेला. तर, आपल्या गुंड मुलाचा बचाव करण्यासाठी आलेल्या गुंडाच्या वडिलाला संतप्त जमावाने बेदम चोप दिला. नंतर त्याचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. सक्करदरातील भांडेप्लॉट चौकात शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून चौकात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. 


भांडे प्लॉट चौकात एक बहुमजली इमारत आहे. या इमारतीतील पार्किंगची जागा बिल्डरने बंटी ऊर्फ शेर खान नामक गुंडाला विकली. त्याने तेथे चिकन सेंटर लावले. त्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या बंटीने या इमारतीतील रहिवाशांना वेठीस धरणे सुरू केले. त्याने आधी बाजूच्या चक्की (गिरणी)वर अतिक्रमण केले आणि नंतर येण्याजाण्याच्या मार्गात पानटपरी सुरू केली. आजूबाजूचा परिसर तो घाणेरडा करू लागला. चिकन सेंटरमधील घाणेरड्या मालाची तो योग्य विल्हेवाट न लावता बाजूलाच फेकू लागला. त्यामुळे परिसरातील रविवासी त्रस्त झाले. कुणी विरोध केल्यास तो अपमान करून मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे नागरिक त्याच्या वाटेला जात नव्हते. ते पाहून तो जास्तीच निर्ढावला. तो आता बाजूच्या दुकानदारांनाही धमकावत होता.  

दोन, तीन महिन्यांपासून त्याचा उपद्रव वाढल्याने नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत होता. या पार्श्वभूमीवर, शनिवारी पहाटे त्याने जयंतीलाल जैन नामक व्यापाऱ्याच्या किराणा आणि जनरल स्टोअर्सच्या शटरचे कुलूप तोडून त्या दुकानाला आपले कुलूप लावले. नेहमीप्रमाणे जैन आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना त्यांच्या कुलूपाऐवजी भलतेच कुलूप दुकानाच्या शटरला लागून दिसले. त्यामुळे त्यांनी ते कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असता गुंड बंटी खान जैन यांच्या अंगावर धावून आला. जैन यांनी यावेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला निघून गेले.
त्यांनी आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्यांना हा प्रकार सांगितला. काही वेळेनंतर ते परत दुकान उघडण्यासाठी आले असता, आरोपी बंटी खान भला मोठा चाकू घेऊन जैन यांच्यावर धावला. जीवाच्या भीतीने जैन पळत सुटले तर, गुंड बंटी खान त्यांच्या मागे धावू लागला. ते पाहून त्याच्या गुंडगिरीला त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांच्या रोषाचा भडका उडाला. नागरिकांनी एकसाथ त्याच्याकडे धाव घेतली. काहींनी त्याला बाजूचे दगड फेकून मारले. आपली खैर नाही, हे लक्षात आल्यामुळे गुंड बंटी जीवाच्या धाकाने उलटपावली पळून गेला. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
गुंड बंटीने पहाटेच्या वेळी जैन यांच्या दुकानाला कुलूपं लावून दुकानावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून जमावाने त्याची कुलूपं तोडून फेकली. प्रचंड तणावाचे वातावरण असताना बंटीचे वडील जमावात आले आणि त्यांनी आपल्या मुलाच्यावतीने दिलगीरी व्यक्त करण्याऐवजी बंटीच्या बाजूने बोलू लागले. त्यामुळे जमावातील काहींनी बंटीच्या वडिलांना चोप देऊन पळवून लावले. दरम्यान, बंटीच्या चिकन सेंटर आणि पानटपरीचे अतिक्रमण उपटून फेकण्याची जमावाने तयारी केल्यामुळे चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदऱ्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्नेहल बिहरे, रिता मुळे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आपल्या पथकासह तेथे पोहचले. सहायक आयुक्त हरीश राऊत यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळण्याचा धोका लक्षात घेऊन राखीव दलाचे जवानही बंदोबस्तासाठी बोलवून घेण्यात आले. त्यानंतर गुंड बंटी खानची पानटपरी, चिकन सेंटर आणि त्याने केलेले अतिक्रमण सर्वच जमीनदोस्त करण्यात आले.
अक्कूची पुनरावृत्ती टळली
जैन यांच्यामागे चाकू घेऊन धावणारा गुंड बंटी खान संतप्त जमावाच्या हातात लागला असता तर शहरात पुन्हा एकदा अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असती. जीव मुठीत घेऊन आरडाओरड करीत तो पळून गेल्याने बचावला. दरम्यान, जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी बंटी खानविरुद्ध अनधिकृतपणे दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Rampaged mob attacked on goon who created terror on the tip off knife in Nagpur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.