रामटेक व नागपुरात होणार कालिदास लोकमहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:33 AM2017-10-31T11:33:53+5:302017-10-31T11:36:48+5:30
कालिदास महोत्सव हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपुरात विविध कार्यक्रम होणार असून दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये लोकमहोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कालिदास महोत्सव हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपुरात विविध कार्यक्रम होणार असून दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये लोकमहोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
येत्या १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान नागपुरातील सुरेश भट सभागृहात कालिदास महोत्सव होणार आहे. यात अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक व कलावंत आपली कला सादर करणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये या महोत्सवाअंतर्गत लोक महोत्सव होईल. रामटेकमधील नेहरू ग्राऊंडवर २७ व २८ जानेवारी रोजी हा लोकमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या लोकमहोत्सवात आदिवासींसह झाडीपट्टी व भटके विमुक्तांसह विविध लोक संगीत व लोकनृत्य सादर करणार आहे. गडचिरोलीसह विविध राज्यातील लोक कलावंतांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हा लोकमहोत्सवसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा राहणार आहे.
आदिवासी विकास विभागाने यासाठी आर्थिक सहकार्य दिले असून दक्षिण मध्य सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होईल. कालिदास महोत्सवातील नागपूर व रामटेकमध्ये होणारे सर्व कार्यक्रम हे नि:शुल्क असून त्यासाठी कुठल्याही प्रवेशिका राहणार नाही, असेही विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी स्पष्ट केले. कालिदास महोत्सवाच्या प्रचार प्रसारासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.