दाेनदा डिमांड भरूनही मिळेना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन, शेतकऱ्याच्या ५ वर्षापासून हेलपाट्या

By निशांत वानखेडे | Published: May 24, 2023 04:55 PM2023-05-24T16:55:44+5:302023-05-24T16:56:22+5:30

महावितरणचा अजब कारभार

ramtek farmer struggling since 5 years for electricity connection for agricultural pump even after paying demand bill for two times | दाेनदा डिमांड भरूनही मिळेना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन, शेतकऱ्याच्या ५ वर्षापासून हेलपाट्या

दाेनदा डिमांड भरूनही मिळेना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन, शेतकऱ्याच्या ५ वर्षापासून हेलपाट्या

googlenewsNext

नागपूर : महावितरणद्वारे शेतकऱ्यांच्या पिळवणूकीचे आणखी एक प्रकरण प्रकाशात आले आहे. एकाच शेतासाठी एक साेडून दाेनदा डिमांड भरूनसुद्धा एका शेतकऱ्याला ५ वर्षापासून कृषी पंपासाठी वीज जाेडणी दिलेली नाही. रामटेक तालुक्यातील पटगाेवारी येथील शेतकऱ्याची या कार्यालयातून त्या कार्यालयात व मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत चकरा मारून ससेहाेलपट झाली आहे.

प्रशांत भास्कर दुधपचारे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या प्रशांत यांची गावात वडिलाेपार्जित ५ एकर शेती आहे. आधुनिक शेती करण्याच्या विचाराने या तरुण शेतकऱ्याने २०१८ साली शेतात कृषी पंपासाठी चंद्रकांत दुधपचारे यांच्या नावे महावितरणच्या रामटेक कार्यालयात अर्ज सादर केला. १३ मार्च २०१८ राेजी डिमांडची ५८४८ रुपये रक्कम भरली आणि कृषी पंपासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्ततासुद्धा केली. मात्र अनेक महिने प्रतीक्षा करूनही त्यांच्या शेतापर्यंत विद्युत जाेडणी पाेहचली नाही. यादरम्यान काेराेना काळात प्रशांत यांना नाेकरी गमवावी लागली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरभरणाची जबाबदारी ते शेतीच्या भरवशावरच पूर्ण करू शकत हाेते. त्यामुळे वीज जाेडणी मिळावी म्हणून त्यांनी आणखी प्रयत्न सुरू केले.

यादरम्यान महावितरणच्या रामटेक कार्यालयाने प्रशांत यांना पुन्हा डिमांड भरण्यास सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार प्रशांत यांनी पुन्हा १० डिसेंबर २०२१ राेजी ११,८४५ रुपये डिमांडची रक्कम भरली आणि नव्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र यावेळी सुद्धा महावितरणने त्यांची फसवणूक करून शेतापर्यंत विद्युत जाेडणी पाेहचविली नाही. अनेकदा महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या मारूनसुद्धा प्रशांत यांच्या पदरी निराशाच आली. ५ वर्षे या अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे चकरा मारूनसुद्धा प्रशांत यांना न्याय मिळाला नाही. सहानुभूती तर साेडा, उलट त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली जात असल्याचे प्रशांत यांनी सांगितले. महावितरणच्या अशा बेजबाबदारपणामुळे प्रशांत यांना नैराश्याने घेरले असून आधुनिक शेती करण्याचे त्यांचे स्वप्न मातीमाेल हाेत आहे.

मंत्री ते अधिकाऱ्यापर्यंत उंबरठे झिजविले

प्रशांत दुधपचारे यांनी न्याय मिळावा म्हणून महावितरण रामटेकचे शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता, माैदा यांना निवेदन दिले. यादरम्यान तत्कालिन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनाही निवेदन सादर करून कैफियत मांडली. त्यांनी नागपूर ग्रामीणचे अधिक्षक अभियंता यांना तत्काळ कारवाई करून माहिती देण्यास सांगितले पण पुढे काही झाले नाही. प्रशांत यांनी अधिक्षक अभियंता यांनाही निवेदन दिले. पुन्हा जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले. या सर्व अधिकाऱ्यांना एक नव्हे तर दाेन-तीनदा निवेदन दिले. वर्तमान ऊर्जा मंत्र्यांनाही निवेदन दिले. मात्र प्रशांत दुधपचारे यांची ससेहाेलपट संपता संपली नाही.

लगतच्या शेतकऱ्याचे ठरले कारण

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दुधपचारे यांच्या शेतालगत शेत असलेला शेतकरी विद्युत पाेल गाडण्यासाठी परवानगी देत नसल्याचे कारण दिले जात आहे. मात्र दुधपचारे यांच्या शेताच्या १५० मीटरच्या अंतरावरून विद्युत लाईन गेली आहे. या लाईनवरून काहीतरी उपाययाेजना करून वीज कनेक्शन देता आले असते. मात्र महावितरणचे अधिकारी एका कारणासाठी पुढची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आराेप प्रशांत यांनी केला.

Web Title: ramtek farmer struggling since 5 years for electricity connection for agricultural pump even after paying demand bill for two times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.