रामटेक पॅसेंजर अजनी रेल्वे स्थानकापर्यंत चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:04 PM2018-12-12T22:04:01+5:302018-12-12T22:04:51+5:30
प्रवाशांच्या सुविधेसाठी रामटेक पॅसेंजरला कामठीवरून नागपूर किंवा अजनी रेल्वे स्थानकापर्यंत चालवावी, अशी सूचना विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी रामटेक पॅसेंजरला कामठीवरून नागपूर किंवा अजनी रेल्वे स्थानकापर्यंत चालवावी, अशी सूचना विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या सभागृहात विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीला विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य मुरारीलाल शर्मा, आनंद कुमार कारिया, नटवरलाल गांधी, विकास बोथरा, नानकराम अनवानी, मुरलीधर ढोबरे, नरेंद्र मुदलियार, चंद्रकांत पांडे, कुंजबिहारी अग्रवाल, अरुण आखतकर, योगेश अग्रवाल आणि संजय गजपुरे उपस्थित होते. बैठकीत सदस्यांनी रेल्वे प्रशासनास प्रवाशांच्या सुविधेसाठी उपयुक्त सूचना केल्या. यात कामठी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर कोच इंडिकेटर लावावे, प्लॅटफार्म शेडचा विस्तार करणे, गोंदिया रेल्वेस्थानक परिसरात त्वरित कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू करावे, गोंदिया-नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या सामान्य आणि मासिक पासधारकांना सुविधा द्याव्या, गोंदिया रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक १ वरून सोडण्यात यावी, १९३१७/१९३१८ इंदूर-पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेसला गोंदियात थांबा द्यावा, गोंदियात रेल्वेची सेंट्रल स्कूल सुरू करावी, सालेकसा रेल्वे स्थानकावर १२८५५/१२८५६ इंटरसिटी एक्स्प्रेसला थांबा द्यावा, नागभीड रेल्वे स्थानकावर १७००७/१७००८ दरभंगा एक्स्प्रेसला थांबा द्यावा, नागभीड रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला फूट ओव्हरब्रीज तयार करावा, रेल्वेगाड्या आणि स्थानकावर अवैध व्हेंडर आणि इतवारी रेल्वेस्थानक परिसरात अवैध वाहनांवर कारवाई करावी, मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एलएचबी कोच लावावे, आदी सूचना सदस्यांनी केल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, समिती आपल्या कार्यकाळात रेल्वेसेवेत सुधारणा आणि रेल्वेगाड्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रभावी पद्धतीने कार्य करणार आहे. त्यांनी विभागातील विकासकामे आणि प्रवासी सुविधांची माहिती दिली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक वाय. एच. राठोड, समितीचे सचिव वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव उपस्थित होते. आभार आशुतोष श्रीवास्तव यांनी मानले.