रामटेकमध्ये कडकडीत बंद
By admin | Published: March 10, 2016 03:39 AM2016-03-10T03:39:27+5:302016-03-10T03:39:27+5:30
महाशिवरात्रीनिमित्त नागार्जुन टेकडीवर त्रिशूल नेण्यावरून शिवभक्त व पोलिसांमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता.
नागार्जुन टेकडी प्रकरण : पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचा आरोप
रामटेक : महाशिवरात्रीनिमित्त नागार्जुन टेकडीवर त्रिशूल नेण्यावरून शिवभक्त व पोलिसांमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला होता. जमावाकडून दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना जामीन न मिळाल्यामुळे न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप माजी आ. आशिष जयस्वाल यांनी केला. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी रामटेक बंदचे सर्वपक्षीय आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना निवेदन सोपविले. मोर्चादरम्यान, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नागार्जुनप्रकरणी पोलिसांनी संजय भिक्षूलाल दमाहे (२२, रा. चिचाळा), राहुल विद्याधर टोंगसे (३२, रा. रामटेक), अविनाश शेषराव येलुरे (२०, रा. नवरगाव), अशोक हुकुमपुरी गोसावी (४५, रा. घोटीटोक), गोकुल नारायण पाटील (३०, रा. रामटेक) व उमेश सुदाम झाडे (४०, रा. तेलंगखेडी, ता. रामटेक) या सहा जणांना अटक केली तर नरेश माकडे हा फरार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ३३३ व ४२७ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. शिवभक्तांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर रामटेक बंदचे आयोजन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून नागार्जुन शिवमंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी जातात आणि त्रिशूल अर्पण करणे ही भक्तांची परंपरा आहे. या बाबीस मागील काही वर्षापासून काही जण आक्षेप घेत आहेत. पोलिसांकडून दरवर्षी शिवभक्तांना संरक्षण मिळते. यावर्षी पोलिसांनी भाविकांना अडवून त्रिशूल नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे भाविक व पोलिसांमध्ये वाद झाला. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, अशी माहिती बंदचे आंदोलकर्त्यांनी दिली.
सदर प्रकरणात पोलिसांनी मिळेल त्यास पकडून अटक केली व गुन्हे नोंदविले. अटक केलेल्यांवर भादंवि कलम ३३३ सारखे कलम मुद्दाम दाखल करण्यात आले. कारण अटकेनंतर जामीन मिळू नये असा त्यामागे उद्देश होता. पोलिसांनी शिवभक्तांना संरक्षण देण्याऐवजी प्रथा, परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यास प्रतिबंध केला.
दरवर्षी महाशिवरात्रीला नागार्जुन परिसरात तणाव निर्माण होतो, ही माहिती असतानादेखील उपाययोजना म्हणून शांतता समितीची बैठक पोलिसांनी घेतली नाही. दरवर्षीचा तणाव लक्षात घेता योग्य पोलीस बंदोबस्तही नव्हता. असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांकडे घटनास्थळाची चित्रफित असताना त्यामध्ये भाग घेणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता पोलिसांनी मिळेल त्याला अटक करून कारवाई केली, हे योग्य नाही. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावी
दरम्यान, बुधवारी माजी आ. आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावी व जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तसेच नागार्जुनप्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना विचारणा केली असता, उच्च न्यायालयाचा या परिसरात ‘जैसे-थे’चा आदेश आहे आणि तो पोलीस व प्रशासनाने पाळताना केलेली कारवाई उचित आहे, असे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात योगेश वाडीभस्मे, रमेश कारामोरे, सुनील देवगडे, बिकेंद्र महाजन, अनिल वाघमारे, राजेश किंमतकर,उमेश महाजन, सुमित कोठारी, दिनेश माकडे, धीरज राऊत, राजूबाबा मोहन गिरी महाराज, करीम मालाधारी, दीपक जैन, चुन्नीलाल चौरासिया, राहुल ठाकूर आदींची उपस्थिती होती.