रामटेक तालुक्याला ६५२०.५ क्विंटल बियाण्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:08 AM2021-05-21T04:08:54+5:302021-05-21T04:08:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील एकूण २८,११६ हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी केली जाणार असून, त्यासाठी एकूण ६५२०.५ क्विंटल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील एकूण २८,११६ हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी केली जाणार असून, त्यासाठी एकूण ६५२०.५ क्विंटल बियाण्यांची गरज आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी खरीप पीक आढावा बैठकीत दिली. धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रामटेक तालुक्यातील साेयाबीनचे पीक हद्दपार झाल्यागत आहे तर कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचेही आकडेवारीवरून लक्षात येते.
तालुक्यातील शेतकरी टिपीव, फाेकीव, पेरीव व राेवणी या चार पद्धतीने धानाची पेरणी करतात. यावर्षी २१,५०० हेक्टरमध्ये धानाच्या राेवणीचे नियाेजन करण्यात आले असून, यात १५८ हेक्टरमध्ये टिपीव, १०३ हेक्टरमध्ये फाेकीव, १०३ हेक्टरमध्ये पेरीव तर उर्वरित २०८०२.९५ हेक्टरमध्ये राेवणी करून धानाचे पीक घेतले जाणार असल्याचे स्वप्निल माने यांनी स्पष्ट केले. धानाच्या पिकाला एकरी २० हजार रुपये खर्च येत असून, तुलनेत भाव कमी मिळत असल्याने धानाचे पीक परवडत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
तालुक्यात ३,५०० हेक्टरमध्ये कपाशी, २,१०० हेक्टरमध्ये तूर, ३५० हेक्टरमध्ये भाजीपाल्याची विविध पिके, २५ हेक्टरमध्ये मका, ७५ हेक्टरमध्ये साेयाबीन, चार हेक्टरमध्ये विविध फुले, दाेन हेक्टरमध्ये हळदीच्या पिकाचे नियाेजन करण्यात आले आहे. त्यासाठी ५,९४७ क्विंटल धान, ६७ क्विंटल कपाशी, १३५ क्विंटल तूर, ३७ क्विंटल साेयाबीन, १.५ क्विंटल मक्याच्या बियाण्यांची गरज भासणार असल्याने या बियाण्यांची मागणी नाेंदविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाेगस बियाण्यांमुळे फसगत हाेत असल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांनी संशाेधित बियाण्यांचा वापर करावा. बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी तसेच धानाची श्री पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी केले आहे.
....
रासायनिक खतांची मागणी नाेंदविणार
रामटेेक तालुक्यात या खरीप हंगामासाठी ३,५०० मेट्रिक टन युरिया, १,००० मेट्रिक टन डीएपी, ३०० मेट्रिक टन म्युरेट ऑफ पाेटॅश, ९०० मेट्रिक टन सिंगल सुपर फाॅस्फेट, ३०० मेट्रिक टन १०:१५: १५, ७०० मेट्रिक टन २०:२०:००, २०० मेट्रिक टन इतर संयुक्त व मिर रासायनिक खतांची गजर भासणार असल्याने ही मागणी राज्य शासनाकडे नाेंदविण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी रासायनिक ऐवजी जैविक खते वापरण्यावर भर द्यावा. माती परीक्षण करून खतांचे नयाेजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.