रामटेकमध्ये पाच आयसीयू बेडची सुविधा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:29+5:302021-05-09T04:09:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रामटेकमध्ये ६५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. परंतु ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रामटेकमध्ये ६५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. परंतु आयसीयू बेडची सुविधा नसल्याने रुग्ण गंभीर झाल्यास त्याला नागपूरला हलवावे लागत हाेते. नागपूरला बेड मिळणे कठीण झाल्याने अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रामटेकमध्ये पाच आयसीयू बेड तसेच देवलापार व पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेडची सुविधा मिळणार आहे. याबाबत जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.
रामटेकमध्ये आयसीयू बेड तसेच देवलापार व पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे नागरिकांनी केली. त्यानुसार जिल्हा आराेग्य अधिकारी तथा काेविड-१९ नाेडल अधिकारी नागपूर यांनी रामटेक उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाच आयसीयू बेड तसेच देवलापार व पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात आवश्यक साधनसामुग्रीसह औषधे, मनुष्यबळ व ऑक्सिजनयुक्त बेडकरिता आवश्यक असलेले सिलिंडर, मॅनीफाेल्ड, काॅन्सन्ट्रेटर्स व ऑक्सिजन पाईपलाईन या सर्व बाबींचा समावेश असलेला परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे रामटेक तालुक्यातील गंभीर रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न मिटणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश उजगरे यांनी सांगितले की, जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्यात येईल.