रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे
By जितेंद्र ढवळे | Published: April 10, 2024 12:03 PM2024-04-10T12:03:16+5:302024-04-10T12:03:57+5:30
राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे थेट लढत : कडेलोटासाठी काँग्रेसची वज्रमूठ
जितेंद्र ढवळे
रामटेक : जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. यानंतर झालेल्या राजकीय ‘महाभारता’नंतर रामटेकची निवडणूक राज्यभरात चर्चेत आली. रामटेकच्या रणांगणात २८ उमेदवार असले तरी शिंदेसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट टक्कर होताना दिसत आहे.
प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात ‘धनुष्यबाण रामाचा, राजू पारवे कामाचा’, ‘भाभी रहै या भय्या, विरोधीयों की डुबेगी नय्या’ या दोन घोषणांनी रामटेक मतदारसंघातील गावागावांतील राजकीय पारा चढला आहे. अशातच सेनेच्या वाघाला दिल्लीत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी रामटेकच्या कन्हान येथे दाखल होत महाविकास आघाडीच्या वज्रमुठीवर प्रहार करणार आहेत. त्यामुळे यावेळीही ‘मोदी मॅजिक’ चालल्यास रामटेकच्या गडावर सलग तिसऱ्यांदा भगवा फडकत शिंदेसेनेच्या पारवेंना प्रभू श्री रामाचा आशीर्वाद मिळेल की सामाजिक समतेचा ‘धागा’ गुंफत बर्वे नवा अध्याय रचतील याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
भाजचे गावागावांत नेटवर्क असलेल्या या मतदारसंघात मोदी लाटेत सलग दोनवेळा शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी दिल्ली गाठली. यावेळी काँग्रेसची साथ सोडत अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी हातात धनुष्यबाण घेतला. इकडे उमदेवारी अर्ज भरेपर्यंत काँग्रेसच्या थिंक टॅंकमध्ये असलेले किशोर गजभिये यांनीही वंचितच्या पाठिंब्यावर रामटेकच्या लढाईत ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे. रामटेकच्या तीन प्रमुख उमदेवारांचे सध्या झेंडे वेगळे असले तरी असली कोण अन् नकली कोण, याबाबत मतदारांत चर्चा रंगली आहे.
सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसला ‘कडू’ कारल्याची उपमा दिली. तर दुसरीकडे प्रहारचे आ. बच्चू कडू यांनी अमरावतीचा वचपा काढत काँग्रेसच्या बर्वे यांना पाठिंबा देत महायुतीत पुन्हा चलबिचल वाढवली आहे.
वंचितची माघार; गजभियेंना पाठिंबा
रामटेकचा गड सर करताना बसपाच्या हत्तीला धाप लागली आहे. यावेळी केडरवर विश्वास ठेवत बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी संदीप मेश्राम यांना संधी दिली आहे. मेश्राम यांच्यासह बसपाच्या पूर्व विदर्भातील उमदेवाराच्या प्रचारासाठी मायावती ११ एप्रिल रोजी नागपुरात येत आहेत. ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीच्या शंकर चहांदे यांनी रामटेकचे मैदान सोडल्याने अपक्ष किशोर गजभिये यांच्या ‘प्रेशर कूकर’मध्ये नवी राजकीय डाळ तर शिजत नाही ना, यावरून मतदारांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र दलित, आदिवासी, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांवर या मतदारसंघात उमेदवारांची भिस्त असेल, असे चित्र आजतरी स्पष्टपणे दिसत आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
रामटेकमध्ये शिंदेसेनेचे संघटन मजबूत नसल्याचे कारण देत भाजपने या जागेवर दावा केला होता. अखेरपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकसाठी अडून राहिले. त्यामुळे उमेदवार भाजपचा अन् झेंडा सेनेचा, असे प्रचारातील चित्र आहे. इकडे निष्ठावंत शिवसैनिकांना प्रचारात सक्रिय करण्यासाठी शिंदे यांनी दोन दिवस मतदारसंघात तळ ठोकला.
उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या काही तासांपूर्वी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द होणे, यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणे, नंतर तातडीने जि. प. सदस्यत्व कसे रद्द करण्यात आले, हा प्रचाराचा मुद्दा करीत मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी रश्मी बर्वे या पती श्यामकुमार बर्वे यांच्यासाठी गावागावांत पोहोचत आहेत.
रामटेकमध्ये लोकसभेच्या २०,२९,०८५ मतदारापैकी ८,९०,३८९ मतदार हे हिंगणा आणि कामठी या दोन मतदारसंघात आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपची मजबूत पकड आहे. बहुतांश कामगारवर्ग या दोन्ही मतदारसंघात राहतो. त्यामुळे काँग्रेसला येथे प्रहारची किती मदत होते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
२०१९ मध्ये काय घडले?
कृपाल तुमाने शिवसेना (विजयी) ५,९७,१२६
किशोर गजभिये काँग्रेस ४,७०,३४३
सुभाष गजभिये बसपा ४४,३२७
नोटा - ११,९२०
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील स्थिती
विजयी उमेदवार पक्ष (मतदारसंघ) मते
टेकचंद सावरकर भाजप (कामठी) १,१८,१८२
आशिष जयस्वाल अपक्ष (रामटेक) ६७,४१९
राजू पारवे काँग्रेस (उमरेड) ९१,९६८
समीर मेघे भाजप (हिंगणा) १,२१,३०५
सुनील केदार काँग्रेस (सावनेर) १,१३,१८४
अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस (काटोल) ९६,८४२
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते
२०१४ कृपाल तुमाने शिवसेना ५,१९,८९२
२००९ मुकुल वासनिक काँग्रेस ३,११,६१४
२००४ सुबोध मोहिते शिवसेना २,७६,७२०
१९९९ सुबोध मोहिते शिवसेना २,४२,४५४
१९९८ राणी चित्रलेखा भोसले काँग्रेस ३,२५,८८५