विकासवाटा दर्शविणारा रामझुला वाहतुकीसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 09:13 PM2019-01-18T21:13:29+5:302019-01-18T21:15:37+5:30
नागपूर शहर संपूर्ण देशात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेल्या विकासकामांमुळे देशपातळीवर नागपूरने आपली वेगळी छाप सोडली आहे. शहराच्या विकासावाटा दर्शविणाऱ्या रामझुल्याचा दुसऱ्या टप्पा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उड्डाण पुलामुळे रेल्वे स्टेशनलगतच्या जयस्तंभ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर संपूर्ण देशात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेल्या विकासकामांमुळे देशपातळीवर नागपूरने आपली वेगळी छाप सोडली आहे. शहराच्या विकासावाटा दर्शविणाऱ्या रामझुल्याचा दुसऱ्या टप्पा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उड्डाण पुलामुळे रेल्वे स्टेशनलगतच्या जयस्तंभ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकार्पण प्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक दयशंकर तिवारी, प्रवीण दटके, बंडू राऊ त, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्य अभियंता उल्हास देबाडवार, मुख्य अभियंता सुधाकर मुरारे, अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे, मनोज तालेवार आदी उपस्थित होते.
पूर्वीच्या अस्तित्वातील १०० वर्षे जुन्या कमानी पुलाऐवजी नवीन ६ पदरी नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्याच्या सुधारित प्रस्तावाप्रमाणे ६९.६२ कोटी खर्च आला आहे. नागपूर शहर एकात्मिक योजनेमध्ये संत्रा मार्केट येथील सहा पदरी केबल स्टेड रेल्वे उड्डाण पुलाचे काम समाविष्ट असून यासाठी ३५० कोटी रुपये खर्चाची योजना बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर मंजूर केली होती.
नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या ५१७.३६ कोटी रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकास शासनाने नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे. जुना रेल्वे उड्डाण पूल तोडण्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण करण्यात आले. यामध्ये सुमारे १३० टन क्षमतेची क्रेन तसेच वायर सॉ यांचा उपयोग करून पुलाचा प्रत्येक भाग कापून वरचेवर क्रेनने काढण्यात आला. हे काम करताना खाली असणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. राज्यात अशा स्वरूपाचे केबल स्टेड उड्डाण पूल असून वांद्रे वरळी सागरी सेतू आणि संत्रा मार्केट उड्डाण पुलाचा समावेश आहे. दोन्ही पूल रस्ते विकास महामंडळाने बांधले आहेत.