पतंगाच्या मागे धावला, रेल्वेखाली चिरडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 08:55 PM2021-01-06T20:55:21+5:302021-01-06T20:57:10+5:30

kite victim, nagpur news पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका १२ वर्षाच्या मुलाचा रेल्वेगाडीच्या धडकेने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी कोराडीच्या शिवकृष्ण धाम झोपडपट्टीजवळ घडली. एंटा विनोद सोळंकी असे मृत मुलाचे नाव आहे.

Ran after the kite, crushed under the train | पतंगाच्या मागे धावला, रेल्वेखाली चिरडला

पतंगाच्या मागे धावला, रेल्वेखाली चिरडला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका १२ वर्षाच्या मुलाचा रेल्वेगाडीच्या धडकेने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी कोराडीच्या शिवकृष्ण धाम झोपडपट्टीजवळ घडली. एंटा विनोद सोळंकी असे मृत मुलाचे नाव आहे.

ऐंटाच्या वडिलांचा पाच वर्षांपूर्वीच रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तेव्हापासून त्याच्या आईचाही पत्ता नाही. त्याचा एक भाऊ आहे. तो मुंबईत नातेवाईकांकडे राहतो. ऐंटा ७५ वर्षीय आजीसोबत राहत होता. त्याची आजी वॉक्स कुलरजवळील उड्डाणपुलाखाली एका झोपडीत राहते. ती भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवते. मंगळवारी दुपारी ऐंटाने आजीसोबत जेवण केले आणि तो खेळायला घराबाहेर पडला. दुपारी २.३० वाजता तो रेल्वे रुळाच्या काठाने एक कटलेली पतंग पाहून ती पकडण्यासाठी धावला. त्याचवेळी नागपूरवरून दिल्लीला जात असलेली रेल्वेगाडी भरधाव वेगाने आली. पतंग पकडण्याच्या धुंदीत ऐंटा वर आकाशाकडे पाहत धावत होता. त्याला काहीही भान राहिले नाही. तो रेल्वे रुळाकडे जाऊ लागला. घटनास्थळापासून कााही अंतरावर मजूर दुरुस्तीचे काम करीत होते. मुलाला रुळाकडे धावत जाताना पाहून ते ओरडू लागले. त्यांचे ओरडणेही ऐंटाला ऐकू आले नाही. मजूर काही करतील त्यापूर्वीच धावत्या रेल्वेला धडकून ऐंटा गंभीर जखमी झाला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मजुरांनीच कोराडी पोलीस व रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. कोराडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ऐंटाचा मृतदेह मेयो रुग्णालयात रवाना केला. नातवाच्या मृत्यूची माहिती मिळताच वृद्ध आजीला प्रचंड मानसिक धक्का बसला. पाेलिसांनी ऐंटाच्या नातेवाईकांनाही सूचना दिली. त्यांच्या मदतीने बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

एका आठवड्यातील ही दुसरी घटना

एका आठवड्यात पतंगामुळे बालकाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. २९ डिसेंबर रोजी वाडी बायपास मार्गावर पतंग पकडण्याच्या प्रयत्नात एका ७ वर्षीय वंश विकास तिरपुडे याचा जीव गेला होता. वंश पतंग पकडताना धावत रस्त्यावर गेला होता. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनाने त्याला चिरडले. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हाेता. त्याचप्रकारे ३० डिसेंबर रोजी झिंगाबाई टाकळी येथे नायलॉन मांजामध्ये अडकून १७ वर्षीय आदित्य संतोष भारद्वाज हा तरुण जखमी झाला होता.

Web Title: Ran after the kite, crushed under the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.