रणरागिणी लढली...
By admin | Published: October 4, 2015 03:12 AM2015-10-04T03:12:02+5:302015-10-04T03:12:02+5:30
दिवसाढवळ्या दोन लुटारू एका महिलेच्या घरात शिरतात. घरात ती एकटीच असल्याचे पाहून तिचे हात पकडून, तोंड दाबून बेदम मारहाण करतात. नंतर तिच्या सदनिकेत आदळआपट करतात.
लुटारूंना बदडून पळविले : मनीषनगरातील घटना
नरेश डोंगरे नागपूर
दिवसाढवळ्या दोन लुटारू एका महिलेच्या घरात शिरतात. घरात ती एकटीच असल्याचे पाहून तिचे हात पकडून, तोंड दाबून बेदम मारहाण करतात. नंतर तिच्या सदनिकेत आदळआपट करतात. अपेक्षेनुसार काहीच मिळाले नसल्याने चिडलेले लुटारू पुन्हा येऊन तिच्याजवळचे ४ हजार आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतात. रोख आणि मौल्यवान चिजवस्तूंसाठी तिला पुन्हा मारहाण करतात. दरम्यान, त्यांच्या विकृतीची कल्पना येताच तिच्यातील चंडिका जागी होते. बाजूचा लाकडी दांडा उचलून ती दोघांवर तुटून पडते. त्यांना बदड बदड बदडते. परिणामी लुटारू आरडाओरड करीत पळून जातात. हा कुठल्या चित्रपट अथवा टीव्ही मालिकेतील प्रसंग नव्हे तर ही ‘रिअल स्टोरी’ आहे शनिवारी दुपारी मनीषनगरात घडलेली. या प्रसंगातील नायिका अन् तमाम महिला- तरुणींसाठी आदर्श ठरावी, अशा या रणरागिणीचे नाव आहे प्रतीक्षा रचित सिंग !
उच्चविद्याविभूषित प्रतीक्षा केवळ २८ वर्षांची असून ती मूळची भंडारा येथील रहिवासी आहे. तिचे पती प्राध्यापक आहेत. सिंग दाम्पत्य मनीषनगरातील स्वप्नविला अपार्टमेंटमध्ये राहते. या ठिकाणी आणखी दोन परिवार राहतात. दुपारची वेळ, त्यामुळे तिन्ही परिवारांच्या सदनिकांची दारं आतून बंद होती. दुपारी १ च्या सुमारास प्रतीक्षा बँकेत जाण्याच्या तयारीत असताना तिच्या दाराची बेल वाजली. छिद्रातून बघितले तेव्हा बाहेर कुरियर बॉय उभा दिसला. दार उघडताच तिला धक्का देत दोन तरुण आतमध्ये आले. प्रतीक्षाने आरडाओरड करू नये म्हणून एकाने तिचे हात पकडले तर दुस-याने तोंड दाबले. अशाही स्थितीत तिने प्रतिकार करताच दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिचा सत्कारच व्हावा !
बीएससी, एमबीए अशी उच्चशिक्षित असलेली प्रतीक्षा यापूर्वी ‘प्रिंट मीडिया‘त सेवारत होती. सध्या ती गृहिणी म्हणून घर-परिवाराची जबाबदारी सांभाळते. तिने ज्या पध्दतीने लुटारूंचा सामना करून त्यांना पिटाळून लावले, ते पाहता तिचा ‘रणरागिणी‘ म्हणून जाहीर सत्कार व्हावा, अशी प्रतिक्रिया मनीषनगरातून उमटली आहे.