विदर्भाच्या ‘रॅन्चो’ने केली ‘न्यूटन’,‘आईनस्टाईन’ची बरोबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 09:02 PM2018-08-30T21:02:36+5:302018-08-30T21:04:40+5:30
एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दिशा ठरवली अन् स्वत:मधील संशोधक घडविण्यावर भर दिला. इतर सहकारी स्थिरस्थावर होण्यासाठी फिरत असताना या गड्याच्या नावावर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १८ ‘पेटंट’ची नोंदणी आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची स्वत:च्या नावे नोंदणी करुन त्याने विज्ञान जगतातील भीष्माचार्य सर आयझॅक न्यूटन व अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विक्रमांशी बरोबरी केली. अजिंक्य रवींद्र कोत्तावार या अवघ्या २७ वर्ष वयाच्या या तरुणाने आपल्या कर्तृत्वाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दिशा ठरवली अन् स्वत:मधील संशोधक घडविण्यावर भर दिला. इतर सहकारी स्थिरस्थावर होण्यासाठी फिरत असताना या गड्याच्या नावावर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १८ ‘पेटंट’ची नोंदणी आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची स्वत:च्या नावे नोंदणी करुन त्याने विज्ञान जगतातील भीष्माचार्य सर आयझॅक न्यूटन व अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विक्रमांशी बरोबरी केली. अजिंक्य रवींद्र कोत्तावार या अवघ्या २७ वर्ष वयाच्या या तरुणाने आपल्या कर्तृत्वाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे अजिंक्यने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘मेकॅनिकल’ अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. शालेय जीवनापासूनच विविध प्रयोगांची त्याला आवड होती अन् स्वत:मधील वेगळेपण सिद्ध करण्याची प्रेरणा शिक्षिका असलेल्या आई क्षमा व वडील रवींद्र यांनी दिली. वाहनाची कार्यक्षमता वाढविणारे इंजिन, सिल्चर येथील ‘एनआयटी’त एका प्रकल्पासाठी गेलेल्या अजिंक्यने चहाच्या झाडाच्या पानांपासून तयार केलेले ‘बायोडिझेल’, ‘बायोमेट्रीक व्होटिंग सिस्टीम’, ‘मल्टीफ्युएल इंजिन’, ‘इकोफ्रेंडली हिटिंग अॅन्ड कुलिंग सिस्टीम’, ‘रिन्युवेबल बॅटरी पॉवर चार्जर’, ‘वॉटर प्युरिफिकेशन बॉटल’ इत्यादी विविधांगी संशोधन केले. विशेष म्हणजे त्याने ‘मेकॅनिकल’ अभियांत्रिकीसोबतच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कृषी, यांच्यासह विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करुन संशोधन करण्यावर भर दिला.
अल्बर्ट आईनस्टाईन व सर आयझॅक न्यूटन यांच्या नावावर एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची नोंदणी झाल्याचा विक्रम होता. अजिंक्यने एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची नोंदणी करत या विक्रमाची बरोबरी केली. सोबतच वैज्ञानिक भाषेत २५ वर्ष हे अपरिपक्व वय समजण्यात येते. या वयात न्यूटनच्या नावावर १५ ‘पेटंटस’ होते तर अजिंक्यच्या नावावर १२ ची नोंदणी होती.
तयार केला विज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रम
अजिंक्य केवळ संशोधकच नाही तर त्याच्यात एक उत्तम शिक्षकदेखील दडला आहे. कर्नाटक येथे एका विद्यापीठात तो गेला असता त्याने तेथील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रम सुरू केला होता. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर हवा तसा भर देण्यात येत नाही ही खंत त्याला सलायची. अखेर त्याने स्वत: ‘ज्ञान फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली व शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असा प्रात्यक्षिकांवर आधारित नवा अभ्यासक्रमच तयार केला. विद्यार्थी प्रात्यक्षिकातून धडे गिरवतील अशी विविध ५०० मॉडेल्स त्याने तयार केली आहेत. राज्यातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना या माध्यमातून त्याने मार्गदर्शन केले असल्याचा त्याने दावा केला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशाल लिचडे यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट ग्रोथ’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले.
‘सोनम वांगचूक’कडून मार्गदर्शन
गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोगांवर आधारित अभ्यासक्रम राबविणारे व मॅगसेसे पुरस्कार विजेते संशोधक ‘सोनम वांगचूक’ यांनीदेखील अजिंक्यच्या कामाचे कौतुक केले. ‘ज्ञान फाऊंडेशन’ला वांगचूक यांचे मार्गदर्शन मिळत असून डॉ.विजय भटकर, डॉ.प्रकाश आमटे, अविनाश सावजी हेदेखील जुळले आहेत.
संशोधनाचा उपयोग जनतेला व्हावा
गलेलठ्ठ पगाराच्या अनेक ‘आॅफर्स’ माझ्याकडे अगोदरपासून होत्या. मात्र माझे ‘व्हिजन’ स्पष्ट होते. शिवाय मी जवळून लोकांच्या समस्या पाहिल्या आहेत. संशोधनाचा उपयोग जनतेला व्हावा यावर माझा भर राहणार आहे.