राणे दिवाळीनंतरच विदर्भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:07 AM2017-10-06T01:07:48+5:302017-10-06T01:07:58+5:30
काँग्रेसला रामराम ठोकत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नागपूर-विदर्भ दौरा लांबण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसला रामराम ठोकत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नागपूर-विदर्भ दौरा लांबण्याची चिन्हे आहेत. राणे आता आता दिवाळीनंतरच विदर्भाच्या दौºयावर येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत प्रत्येक जिल्ह्यातील समर्थकांकडून माहिती घेतली जात आहे. मंत्रिमंडळातील सहभागानंतर राणे विदर्भात चाचपणीसाठी सक्रिय होतील, असे समर्थकांचे म्हणणे आहे.
राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. त्या वेळी नागपुरातून आपण राज्याचा दौरा करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, नवरात्रीत राणेंचा विदर्भ दौरा झालाच नाही. दसºयाच्या दुसºया दिवशी राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर राणे ८ आॅक्टोबर रोजी नागपुरात येतील, अशी चर्चा होती. नंतर ही तारीख वाढून १६ झाल्याचेही कार्यकर्त्यांना कळविण्यात आले. मात्र, ताज्या निरोपानुसार राणे दिवाळीनंतरच विदर्भात पाऊल ठेवणार आहेत.
या दोन आठवड्यात विदर्भातील समर्थकांना जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या पक्षाचे विदर्भातील पदार्पण धडाक्यात व्हायला हवे, यासाठी राणे गोटाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासाठी कोणत्या जिल्ह्यातून कितपत पाठिंबा मिळेल, कोण कोण ‘स्वाभिमान’मध्ये येतील याचा आढावा घेतला जात आहे. ‘ग्राऊंड रिअॅलिटी’ माहीत करूनच विदर्भातील कार्यक्रमाचे स्वरूप ठरविण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करणाºया नागपूर व विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून समर्थन मिळेल, अशी राणेंना अपेक्षा असावी. मात्र, तसे झाले नाही. चव्हाणांच्या कार्यशैलीची दिल्लीत तक्रार करणाºयांपैकी एकही नेता राणेंच्या समर्थनार्थ समोर आलेला नाही. त्यामुळे नागपुरात राणेंच्या गळाला काहीच लागले नसल्याचे चित्र आहे. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय हिवरकर यांनी राणे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला होता. दुसरे कुणी मोठे समर्थक अद्याप समोर आलेले नाहीत.
भाजपामध्ये न गेल्याने अनेकांची माघार
राणे हे वेगळा पक्ष न काढता भाजपामध्ये गेले असते तर हे निमित्त साधत अनेकांनी भाजपामध्ये एन्ट्री करण्याचा बेत आखला होता. मात्र, राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करताच पडद्यामागील समर्थक माघारी परतले आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण ‘स्वाभिमान’मध्ये येऊ शकत नाही, अशी भूमिका काही समर्थकांनी घेतली आहे.