राणेंना अपेक्षित साथ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:32 AM2017-10-02T00:32:37+5:302017-10-02T00:32:50+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करण्याची घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, काँग्रेस सोडताना नागपुरातून आपण राज्याचा दौरा करण्याची घोषणा करणाºया राणेंनी आता नवा पक्ष स्थापन केल्यानंतरही येथील एकही मोठा नेता उघडपणे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही. फक्त युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व शहर काँग्रेसचे विद्यमान महासचिव अजय हिवरकर यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस सोडल्याची व राणेंच्या पक्षात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली.
राणे यांनी काँग्रेस रिकामी करण्याची सुरुवात नागपूरपासून करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून राणे कधी नागपुरात येतात याची प्रतीक्षा होती. मात्र, राणे अखेरपर्यंत नागपुरात आलेच नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करणाºया नागपूर व विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून समर्थन मिळेल, अशी राणेंना अपेक्षा असावी. मात्र, तसे झाले नाही. चव्हाणांच्या कार्यशैलीची दिल्लीत तक्रार करणाºयांपैकी एकही नेता राणेंच्या समर्थनार्थ समोर आलेला नाही. त्यामुळे नागपुरात राणेंच्या गळाला काहीच लागले नसल्याचे चित्र आहे.
युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व शहर काँग्रेसचे विद्यमान महासचिव अजय हिवरकर यांनी राणे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस सोडण्याची घोषणा केली.
रामेश्वरी चौकातील त्यांच्या निवासस्थानी ढोल-ताशे वाजवून राणे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात’ प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले. हिवरकर हे राणे यांच्या ‘स्वाभिमान’ संघटनेचे विदर्भाचे संघटक आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत हिवरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाले होते.