कालिदास स्मारकावर रंगले बहारदार कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:52+5:302021-07-14T04:11:52+5:30
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारा संचालित भरतमुनी ललित कला केंद्र आणि विदर्भ साहित्य संघाच्या रामटेक येथील शाखेच्या संयुक्त ...
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारा संचालित भरतमुनी ललित कला केंद्र आणि विदर्भ साहित्य संघाच्या रामटेक येथील शाखेच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिनानिमित्त ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
गडमंदिर परिसरातील कालिदास स्मारकावर संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचे उद्घाटन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या रामटेक शाखेचे अध्यक्ष श्रीराम आष्टनकर उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. गिरीश सपाटे, भरतमुनी ललित कला केंद्राच्या समन्वयक डॉ. ललिता चंदात्रे, डॉ. जगदीश गुजरकर उपस्थित होते.
कविसंमेलनाची सुरुवात महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक संस्कृत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. वसंतकुमार भट्ट यांनी केले. कवी कालिदास यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या अलौकिक प्रतिभेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यकृतींचा त्यांनी प्रास्ताविकातून आढावा घेतला. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कविसंमेलनात रामटेक परिसरातील कवींनी बहारदार रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. यात प्रामुख्याने दिनेश बसेने, शिल्पा ढोमणे, संतोष ठकरेले, नचिकेत देशपांडे, सचिन चव्हाण, नामदेव राठोड, राकेश खलासने, प्रशांत बावनकुळे, तुषार चव्हाण, महेश सावंत, डॉ. जगदीश गुजरकर, डॉ. ललिता चंदात्रे, डॉ. राम जोशी, डॉ. गिरीश सपाटे यांनी कवितांचे सादरीकरण केले. अध्यक्षीय संबोधनातून श्रीराम आष्टनकर यांनी महाकवी कालिदास यांच्या स्मृतींना अभिवादन करून काव्यरचना त्यांना समर्पित केल्यात. कार्यक्रमाचे संचालन योगिता गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. जगदीश गुजरकर यांनी मानले.