रणजी ट्रॉफी; वडिलांची सेवा करणारा आदित्य ठरला 'रणजी'चा राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:51 AM2019-02-08T11:51:11+5:302019-02-08T11:51:43+5:30
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत बाद करीत लक्ष वेधणाऱ्या आदित्यने सामन्यात ११ बळी घेत सामनावीराचा मानही मिळविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यात अडचणीच्यावेळी अनेक संकटे उभी राहतात. या संकटांचा सामना करता-करता आशाआकांक्षेवर पाणी फेरण्याचीही अनेकांवर वेळ येते पण संकटांचा धैर्याने सामना करीत वाटचाल करणाऱ्यांना ‘जिगरबाज’ मानले जाते. आलेल्या प्रत्येक दिवसाला सामोरे जात न डगमगता संयमीवृत्तीतून यशाचा मार्ग शोधणारा आदित्य सरवटे त्यातलाच एक खेळाडू.
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत बाद करीत लक्ष वेधणाऱ्या आदित्यने सामन्यात ११ बळी घेत सामनावीराचा मानही मिळविला. या यशामागील आदित्यचे परिश्रम आहेतच शिवाय परिस्थितीने घेतलेल्या परीक्षेत तो कसा उत्तीर्ण झाला, याची प्रेरणादेखील आहे.
वडील २० वर्षांपासून अंथरुणाला खिळून असताना आईने घर चालविण्याची जबाबदारी स्वीकारली. आदित्यचे वडील आनंद हे २० वर्षांआधी भावाला भेटायला मुंबईला गेले असताना त्यांच्या वाहनाला टँकरने धडक दिल्यामुळे ते कोमात गेले. कोमातून काही दिवसांनी ते बाहेर आले तेव्हा त्यांना अर्धांगवायू जडला. तेव्हापासून ते अंथरुणावर आहेत. आई अनुश्री बँकेत कामाला आहेत. त्या कामावर जातात तेव्हा वडिलांना आंघोळ घालण्यापासून जेवण भरविण्यापर्यंतची काळजी आदित्यच घेतो.
लहानपणापासून आदित्यच्या नाजूक खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या तरी तो डगमगला नाही. क्रिकेटसोबतच तो अभ्यासातही हुशार आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने फायनान्शियल मॅनेजमेंटची पदविका घेतली. त्यातही तो ‘टॉपर’ होता. पुढे आईवर असलेला घरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आदित्यने नागपूरच्या एजी कार्यालयात नोकरी पत्करली. २१ वर्षांचा आदित्य केवळ गोलंदाज नाही तर चांगला फलंदाज आणि क्षेत्ररक्षकदेखील आहे. रणजीत चमक दाखविताच त्याच्या नावाची अनेकांना ओळख झाली. त्याचे स्वप्न लहानसे नाही. यंदा एकाच मोसमात सर्वाधिक ५५ गडी बाद करीत या डावखुºया गोलंदाजाने जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवर उपस्थित मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांना दखल घेण्यास भाग पाडले असावे. राष्ट्रीय संघासाठी आपल्याही नावाचा विचार व्हावा, इतकी दावेदारी आदित्यने नक्कीच सादर केली आहे.