खंडणी बनली गळ्यातील हड्डी

By admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:13+5:302016-01-02T08:37:13+5:30

बुकी कम बिल्डरकडून वसूल केलेली पावणेदोन कोटींचे खंडणी प्रकरण अनेकांसाठी गळ्यात फसलेली हड्डी ठरले आहे.

The ransom became bone bone | खंडणी बनली गळ्यातील हड्डी

खंडणी बनली गळ्यातील हड्डी

Next

नरेश डोंगरे ल्ल नागपूर
बुकी कम बिल्डरकडून वसूल केलेली पावणेदोन कोटींचे खंडणी प्रकरण अनेकांसाठी गळ्यात फसलेली हड्डी ठरले आहे. पोलिसांनी आक्रमक भूमिका स्वीकारल्याने या अपहरण आणि खंडणी कांडाशी जुळलेले अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे गुन्हेगारी जगतात या खंडणीने दोन मोठ्या टोळ्या आमने-सामने येण्याच्या तयारीत असल्याने नागपुरात गँगवॉर घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही बिल्डर, काही व्यापारी, बुकी, काळाबाजारी अन् अवैध धंदे करणारी मंडळी नागपुरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांशी जुळलेली आहेत. ती वेगवेगळ्या गुंडांना नियमित ‘प्रोटेक्शन मनी’ देत असल्याचेही अनेकदा उघड झाले आहे. ही मंडळी अनेकदा एखाद्या वादग्रस्त व्यवहारात गुंंडाला भागीदार बनवितात किंवा त्याच्याकडून व्याजाने रक्कम उचलतात. भाईची रक्कम असल्यामुळे पुढे व्यवहारात कोणती आडकाठी येत नाही. अनेकदा माहिती असूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर प्राप्त झालेली रक्कम ठरलेल्या हिस्सेदारीत वाटून घेतली जाते. सौदा फिस्कटला किंवा व्यवहार वादग्रस्त झाला तर कुरबुरी वाढतात. त्यानंतर कब्जा, मारहाण, अपहरणासारखे प्रकार घडतात. १३ डिसेंबर २०१५ लाही असाच प्रकार घडला. थेट गोव्यातील कॅसिनो, बडे बुकीशी संबंध असल्याची चर्चा असणाऱ्या अजय श्यामराव राऊत (वय ४५) या बुकी कम बिल्डरला १०-१२ गुंडांनी त्यांच्या घराजवळून कारमध्ये कोंबले. पाच कोटींची खंडणी मागतिली. राऊतने फोन करून अवघ्या दोन तासात केवळ तीन मित्रांकडून चक्क पावणेदोन कोटी रुपये जमविले. ते अपहरणकर्त्यांना देऊन राऊतने आपली मानगुट सोडवली. मात्र, प्रकरण गुन्हेशाखेत पोहचल्याने आणि पोलिसांनी खोदकाम हाती घेतल्याने या प्रकरणाशी जुळलेले भद्रे, हिराचंदानी, मुणोतसह अनेकजण चांगलेच अडचणीत आले आहेत.

कोण आहे ‘तो’भाई
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एवढी मोठी खंडणी वसूलणारा ‘भाई ’ कोण, या प्रश्नाचे पोलिसांना उत्तर मिळालेले नाही. ते राऊतच सांगू शकतो. मात्र, तो टाळत असल्याने पोलीस अधिकच अस्वस्थ झाले आहेत. त्याला एकदाचे समोर बसविले की नंतर सारा घटनाक्रमच उघड करू, असा पोलिसांना विश्वास आहे. त्यामुळे पोलीस राऊतला हुडकण्यासाठी नागपूर ते गोवा सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. तर, एकदा पोलिसांसमोर बसलो की आपल्या अडचणी आणखी वाढतील, याची जाणीव असल्याने राऊत ‘आऊट आॅफ कव्हरेज’ झाला आहे.
कुणाचा कोणता गेम ?
हे सर्व होत असताना गुंडांच्या दोन तीन टोळ्या या प्रकरणात कुदल्या आहेत. ‘त्याला’ गोवले तर आपले वर्चस्व वाढेल, असा त्यामागे सरळ गेम आहे. त्यामुळे त्यांच्या रात्रीच नव्हे तर दिवसाच्याही बैठकां वाढल्या आहेत. गुन्हेगारी वर्तुळातील चलबिचल लक्षात आल्यामुळे पोलिसांनीही नजर रोखली असून, कोण, कोणता गेम खेळण्याच्या तयारीत आहे, त्याचा पोलीस कानोसा घेत आहेत.

Web Title: The ransom became bone bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.