फ्लॅट बळकावून मागितली ८० लाख रुपये खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:59 PM2020-09-12T21:59:11+5:302020-09-12T22:01:53+5:30
सराफा व्यापाऱ्याचा फ्लॅट बळकावून खंडणीदाखल ८० लाख रुपये हप्ता मागण्याच्या आरोपाखाली धरमपेठ येथील लाहोरी बार संचालक समीर शर्मासह तिघांच्या विरोधात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सराफा व्यापाऱ्याचा फ्लॅट बळकावून खंडणीदाखल ८० लाख रुपये हप्ता मागण्याच्या आरोपाखाली धरमपेठ येथील लाहोरी बार संचालक समीर शर्मासह तिघांच्या विरोधात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाच महिन्यापासून प्रलंबित या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींमध्ये समीर शर्मा याच्यासह लालचंद मोटवानी व राकेश रंजन सहभागी आहेत.
रामदासपेठ निवासी सराफा व्यापारी पंकज भन्साली यांचा गांधीनगर येथील सुकरात अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. भन्साली यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना ३ एप्रिल रोजी आरोपींनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये जबरीने प्रवेश केल्याची माहिती मिळाली. ४ एप्रिल रोजी भन्साली सकाळी फ्लॅटमध्ये आले, तेव्हा त्यांना तेथे आरोपी दिसले. भन्साली यांनी जेव्हा स्वत:ला फ्लॅटचा मालक असल्याचे सांगितले, तेव्हा आरोपींनी ‘फ्लॅट मालक आम्ही आहोत’ असे ओरडत मारझोड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी भन्साली यांना अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देऊ लागले. घाबरलेल्या अवस्थेत भन्साली तेथून निघून गेले. आरोपींनी फ्लॅटमध्ये अनैतिक कृत्य केल्याचे भन्साली यांना कळले. भन्साली यांनी जेव्हा आपल्या परिचितांद्वारे फ्लॅट रिकामा करण्याची विनंती केली तेव्हा आरोपींनी त्या मोबदल्यात ८० लाख रुपये खंडणी मागितली.
भन्साली गेल्या पाच महिन्यापासून आरोपींविरुद्ध प्रकरणाची नोंद करण्यासाठी अंबाझरी पोलीस ठाण्याची चक्कर मारत होते. मात्र, त्यांना पोलिसांकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर भन्साली यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अंबाझरी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश केले. याच आधारावर शुक्रवारी हप्ता वसुली, मारझोड, धमकावणे आणि फ्लॅटवर बळजबरीने कब्जा करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पश्चिम नागपुरात सक्रिय गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे. पोलीस आयुक्तांनी पदभार सांभाळताच ठाणेदारांना संपत्ती विवादाशी निगडित प्रकरणांना गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले आहेत. याच शृंखलेत ही ताजी कारवाई करण्यात आली आहे.