मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 12:51 PM2022-02-12T12:51:05+5:302022-02-12T18:27:18+5:30
नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर :मुंबई-नागपूरबुलेट ट्रेनचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला सादर केला जाईल. समृद्धी महामार्गासोबतच बुलेट ट्रेन येईल. त्यामुळे फक्त ३० टक्केच जमीन अधिग्रहित करावी लागेल, असे केंद्रीय रेल्वे, कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दानवे म्हणाले, नागपूर-मुंबईसह वाराणसी-दिल्ली, अहमदाबाद-दिल्ली या मार्गावरही बुलेटचा डीपीआर लवकरच तयार केला जाणार आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूरच्या रेल्वे अजनी स्टेशनच्या विस्ताराच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे दानवे म्हणाले.
केंद्र सरकारने देशभरात १९०० हून अधिक किसान रेल चालविल्या. यात शेतकऱ्यांना माल वाहतुकीवर ५० टक्के अनुदान देण्यात आले असून, ९० कोटींवर निधी खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वेत आता शिजवलेले अन्न
- प्रत्येक रेल्वेत आता पॅन्ट्री कारची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेत आता पॅक फूड न मिळता पॅन्ट्री कारमध्ये शिजवलेलेच अन्न मिळेल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
अस्तित्व दाखविण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वाढीसाठी महाराष्ट्राला दोष दिला नसून येथील काँग्रेस नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. देशभरात काँग्रेसचे अस्तित्व संपले आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलने करून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते करीत असल्याची टीका दानवे यांनी केली.