लग्न मोडण्याची भीती दाखवून बलात्कार, आरोपीचा जामीन फेटाळला
By admin | Published: August 30, 2015 02:49 AM2015-08-30T02:49:35+5:302015-08-30T02:49:35+5:30
लग्न मोडण्याची भीती दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या एका आरोपीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
नागपूर : विवाह ठरला, पत्रिका वाटल्या. पण, संसारिक जीवनाचे स्वप्न रंगवणाऱ्या एका भावी वधूला चक्क लग्न मोडण्याची भीती दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या एका आरोपीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
योगेश दामोदरराव देवहरे, असे आरोपीचे नाव असून तो सावनेर येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. आरोपी योगेश हा कोतवाली भागात राहणाऱ्या आपल्या ओळखीच्या महिलेच्या घरी हा घृणित प्रकार करीत होता.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, पीडित मुलीच्या लग्नाची योगेशसोबत २१ डिसेंबर २०१४ रोजी अंतिम बोलणी होऊन २९ जानेवारी २०१५ रोजी साक्षगंध झाले होते. १५ मे २०१५ ही लग्नतिथी काढून पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. साक्षगंधानंतर योगेश हा तिच्याशी सतत मोबाईलवर संपर्क करायचा. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी आरोपी हा पीडित मुलीच्या घरी गेला होता. बाहेर फिरायला जाण्याचा बहाणा करून त्याने या मुलीला आपल्या ओळखीच्या महिलेच्या घरी नेले होते. या ठिकाणी त्याने लग्न मोडण्याची भीती दाखवून पीडित मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर तो नेहमीच रविवारच्या दिवशी येऊन पीडित मुलीला याच महिलेच्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करायचा. लग्नात एलसीडी, महाराजा सोफा आणि पाच लाख रुपये रोख रकमेची मागणीही तो करू लागला होता. आपण हुंडा देण्यास असमर्थ असल्याचे पीडित मुलीच्या आई-वडिलाने त्याला बजावले होते. पुढे तो या मुलीचे चारित्र्य बरोबर नाही, असे आरोप करून तिची बदनामी करू लागला होता. प्रियकराचे नाव सांगण्यासाठी तो तिच्यावर सतत दबाव आणून आत्महत्या करण्याची धमकीही देऊ लागला होता.
पीडित मुलीने धाडस करून घडलेली संपूर्ण कर्मकहाणी आपल्या आई-वडिलांना सांगितली होती. मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात योगेशविरुद्ध तक्रार नोंदवताच पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२) (एन) आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. प्रकरण गंभीर असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)