बलात्कार प्रकरण : सुथांदिरा पोन्नुस्वामीस अटकपूर्व जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 11:01 PM2021-06-04T23:01:03+5:302021-06-04T23:17:01+5:30
Rape case, bail reject सत्र न्यायालयाने बंगळुरू येथील प्राप्तिकर विभागाचे सहायक आयुक्त सुथांदिरा बालन पोन्नुस्वामी (३४) यांना बलात्कार प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने बंगळुरू येथील प्राप्तिकर विभागाचे सहायक आयुक्त सुथांदिरा बालन पोन्नुस्वामी (३४) यांना बलात्कार प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. तसेच, त्यांचा संबंधित अर्ज खारीज केला. न्या. एस. ए. अली यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
पीडित तरुणी व्यवसायाने डॉक्टर असून तिच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी १५ मे २०२१ रोजी पोन्नुस्वामी यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. पोन्नुस्वामी यांनी १७ डिसेंबर २०१८ ते १२ जून २०२० पर्यंत नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे. दरम्यान, ते ऑगस्ट-२०१९ मध्ये आजारी पडल्यानंतर पीडित तरुणी काम करीत असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पीडित तरुणीशी ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर पोन्नुस्वामी यांनी लग्न करण्याचे आमिष दाखवून पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार केला. तसेच, तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. पोन्नुस्वामी विवाहित असून ही बाब त्यांनी पीडित तरुणीपासून लपवून ठेवली असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले.