वसतिगृहातील मुलीवर बलात्कार
By admin | Published: June 18, 2017 02:00 AM2017-06-18T02:00:35+5:302017-06-18T02:00:35+5:30
रागारागाने एकटीच होस्टेलकडे निघालेल्या एका तरुणीचे अपहरण करून एका स्कॉर्पिओ चालकाने तिच्यावर बलात्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रागारागाने एकटीच होस्टेलकडे निघालेल्या एका तरुणीचे अपहरण करून एका स्कॉर्पिओ चालकाने तिच्यावर बलात्कार केला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी वाहन चालक असून, अंबाझरी पोलिसांनी त्याला अटक केली.
पीडित २० वर्षीय मुलगी मूळची जबलपूरची रहिवासी आहे. ती एका महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकते. उन्हाळ्याच्या सुटीच्या निमित्ताने ती गावाला गेली होती. शुक्रवारी रात्री ती नागपुरात परतली. तिची आई आणि दोन नातेवाईकांसोबत आपल्या गांधीनगरातील लेडीज होस्टेलकडे एका वाहनाने जात होती. रस्त्यात पंचशील गं्रथालयाजवळ तिचा आईसोबत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात ती खाली उतरली अन् तेथून एकटीच होस्टेलकडे पायी निघाली. रस्त्यात एका स्कॉर्पिओ चालकाने तिला जबरदस्ती आपल्या कारमध्ये बसवून रेल्वेस्थानकावर नेले. डीआरएम आॅफीसजवळ नेल्यानंतर तिला तेथे बसवले आणि बाजूच्यांना ही माझी नातेवाईक आहे, हिला येथून जाऊ देऊ नका, असे म्हणत निघून गेला.
पुन्हा काही वेळेनंतर तो परत आला. त्यानंतर तुला तुझ्या घरी सोडून देतो, असे म्हणून कारमध्ये बसवले. सुसाट वेगाने सेमिनरी हिल्सकडे निर्जन जागेत नेल्यानंतर अंधाऱ्या ठिकाणी त्याने कार उभी केली नंतर कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. तोंड काळे केल्यानंतर तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हाकलून लावले.
दहशतीत आलेली टीव्ही टॉवर मार्गावरील एलएडी कॉलेजजवळच्या प्रवेशद्वारासमोर उभी होती. तेवढ्यात तेथून गिट्टीखदान पोलिसांचे गस्ती वाहन गेले. पोलिसांना तिची अवस्था पाहून संशय आला. त्यांनी तिला विचारपूस केली असता तिने आपली कैफियत सांगितली. प्रकरण अंबाझरी ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे गिट्टीखदानसोबतच अंबाझरी पोलीसही तपासकामी लागले.
कंत्राटी वाहनचालकाची भाईगिरी
पीडित तरुणीने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तिला रेल्वेस्थानकावर नेले. तेथून डीआरएम कार्यालयात तैनात कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून (सीजी ०४ / जेव्ही ५३०१) आलेला आरोपी पप्पू शेख रशिद नामक इसम होता. तो रेल्वे अधिकाऱ्यांसाठी भाडे करारावर घेतलेले वाहन चालवतो. अर्थात तो कंत्राटी वाहनचालक आहे. मात्र, तो रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर भाईगिरी करतो. तो मानकापुरात ज्ञानेश्वर सोसायटीत राहतो, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पत्ता शोधला अन् पहाटेच्या वेळी मानकापुरात त्याच्या घरी जाऊन पप्पूच्या मुसक्या बांधल्या. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरीचे ठाणेदार भीमराव एस. खणदाळे, सहायक निरीक्षक सुरोशे, पीएसआय पाटणकर, पीएसआय लाकडे, महिला उपनिरीक्षक शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी बजावली.