लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
By Admin | Published: November 16, 2015 02:57 AM2015-11-16T02:57:33+5:302015-11-16T02:57:33+5:30
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नागपूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनोज जानराव दुधजोळ (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. मूळचा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेला मनोज एका कंपनीत काम करतो. तो हिंगणा मार्गावरील सीआरपीएफ गेटसमोर राहातो.
पीडित मुलगी वरुड येथील रहिवासी असून ११ वीत शिकते. आरोपी मनोजसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे ते नेहमी फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपी मनोजने तिला लग्नाचे आमिष दाखवून ११ सप्टेंबरला नागपुरात बोलवून घेतले. आपल्या मित्राच्या भाड्याच्या रूमवर तब्बल पाच दिवस तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी इंदोरला जातो म्हणून निघून गेला. बरेच दिवस होऊनही तो परतला नाही. शिवाय तो फोनवरही प्रतिसाद देत नव्हता. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे मुलीने गावाला गेल्यानंतर वरूड ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी बलात्काराची तक्रार नोंदवून प्रकरण नागपुरात घडल्यामुळे ते तपासासाठी एमआयडीसी ठाण्यात पाठविले. शनिवारी रात्री या प्रकरणाची कागदपत्रे मिळताच एमआयडीसीचे ठाणेदार विष्णुकांत भोये यांनी बलात्कार तसेच बालकांचे लैगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)