नागपुरात दोन रुपयाचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:12 AM2018-12-17T10:12:41+5:302018-12-17T10:14:23+5:30
शेजारच्या १० वर्षीय बालिकेला दोन रुपयांचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा (मसाळा) झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजारच्या १० वर्षीय बालिकेला दोन रुपयांचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा (मसाळा) झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली. शनिवारी दुपारी ही घटना उजेडात आल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पीडित बालिका चवथीत शिकते. तिचे आईवडील मोलमजुरी करतात. आरोपी मोंटू उर्फ शमिम शेख लतिफ (वय ३०) हा त्याच वस्तीत राहतो आणि माती-गोट्याचे काम करतो. बालिका त्याला भैय्या म्हणते. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास पीडित बालिका तिच्या घरासमोर खेळत होती. आरोपी मोंटूने तिला दोन रुपये देतो, असे आमिष दाखवून आपल्या घरात नेले. तेथे त्याने तिचे कपडे उतरवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दुपारी पीडित मुलीची आई तिची आंघोळ घालून देत असताना तिच्या गळ्याखाली नखाचे ओरबडे दिसले. त्यामुळे आईने तिला विचारले असता तिने भैय्याने शुक्रवारी दुपारी दोन रुपये देतो, असे म्हणून घरात नेले आणि अत्याचार केल्याची माहिती दिली. त्याच्याच नखाचे हे ओरबडे आहेत, असेही सांगितले. हा संतापजनक प्रकार ऐकून आई हादरली. तिने पती घरी येईपर्यंत चुप्पी साधली. सायंकाळी पीडित मुलीचे वडील घरी परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला. नंतर तो शेजाºयांना माहीत झाला. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मुलीच्या वडिलांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक मिश्रा यांनी गुन्हा दाखल करून बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीला नागरिकांनी झोडपले
दरम्यान आरोपीचे कृत्य माहीत होताच परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला. लोक फरार आरोपीला शोधू लागले. तो लोकांच्या हाती लागला. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलेच झोडपले. वेळीच पोलीस आले अन्यथा लोकांच्या मारहाणीत आरोपीचा जीवही जाऊ शकला असता इतके लोक संतापले होते. या घटनेमुळे चिमुकली दहशतीत आहे. नागरिकांचा संताप लक्षात घेता पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. तर नागरिकांनी दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.