नागपुरात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:15 AM2019-04-04T01:15:32+5:302019-04-04T01:16:20+5:30
जरीपटकात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शेजाऱ्याने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटकात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शेजाऱ्याने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मनीष नीळकंठ गेडाम (४५) रा. जागृतनगर, सुगतनगर असे आरोपीचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी १६ वर्षांची असून तिने बारावीची परीक्षा दिली आहे. तिच्या आईवडिलांचे कुरिअरचे काम आहे. मनीष विद्यार्थिनीच्या आईवडिलांकडे काम करतो. तो त्यांच्या शेजारीच राहतो. कामाच्या माध्यमातून त्याचे विद्यार्थिनीच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान त्याची नजर या विद्यार्थिनीवर पडली. १६ जानेवारीला तो तिच्या घरी आला. त्यावेळी ती एकटीच होती. तिने दिलेल्या बयानानुसार मनीषने तिला पोहे खाण्यासाठी दिले. त्यानंतर ती विद्यार्थिनी बेशुद्ध झाली. त्यानंतर मनीषने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर या विद्यार्थिनीचे शोषण सुरूझाले. मनीषला संधी मिळताच तो तिच्या घरी येऊन तिच्यावर अत्याचार करू लागला. विरोध केल्यानंतर तो या विद्यार्थिनीला धमकावत होता. दरम्यान ती गर्भवती राहिली. सुरुवातीला तिला काहीच समजले नाही. ती मनीषच्या यातना सहन करीत होती. काही दिवसांपासून मनीष तिचे सातत्याने शोषण करीत होता. गर्भवती झाल्यामुळे तिला मनीषचा अत्याचार सहन होत नव्हता. तिच्या वागणुकीवरून कुटुंबीयांनाही शंका आली. तिने घटनेची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी याबाबत जरीपटका पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनीषला अटक केली आहे. मनीष विवाहित असून त्याच्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.