अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींच्या फाशीवर सुनावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:08 AM2021-07-30T04:08:22+5:302021-07-30T04:08:22+5:30
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी सागर विश्वनाथ बोरकर (२५) व निखिल शिवाजी गोलाईत (३०) ...
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी सागर विश्वनाथ बोरकर (२५) व निखिल शिवाजी गोलाईत (३०) यांच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. उद्या, सुनावणीची पुढची तारीख (३० जुलै) आहे.
१३ ऑगस्ट २०२० रोजी बुलडाणा येथील पोक्सो कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३७६-डीबी (१२ वर्षांखालील मुलीवर सामूहिक बलात्कार) अंतर्गत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय आरोपींना भादंविच्या कलम ३७६-२-एम (बलात्कार करताना गंभीर दुखापत करणे) अंतर्गत जन्मठेप, कलम ३६३ (अपहरण) अंतर्गत ७ वर्षे कारावास तर, कलम ५०६ (धमकी देणे) अंतर्गत २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले आहे. तसेच, आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध वेगवेगळे अपील दाखल केले आहे. त्यावरील अंतिम सुनावणीमध्ये सर्वप्रथम आरोपी गोलाईतचे वकील ॲड. राजेंद्र डागा यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे. त्यांनी प्रकरणातील प्राथमिक मुद्दे न्यायालयासमक्ष मांडले आहेत. शुक्रवारी ते गुणवत्तेवर युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यानंतर आरोपी बोरकरच्या वतीने ॲड. अनिल ढवस तर, सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे बाजू मांडतील.
---------------
अशी घडली घटना
ही संतापजनक घटना चिखली येथील आहे. २६ एप्रिल २०१९ रोजी मध्यरात्रीनंतर १ च्या सुमारास आरोपींनी पीडित मुलीचे तिच्या घरातून अपहरण केले. त्यानंतर तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच, याविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारू अशी धमकी दिली. घटनेच्या वेळी पीडित मुलगी ९ वर्षे वयाची होती.