बलात्कार-खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:27 PM2019-12-02T20:27:15+5:302019-12-02T20:30:22+5:30
सत्र न्यायालयाने तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधिश पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला.
जीवन ऊर्फ आकाश अजाबराव छापाने (३०) असे आरोपीचे नाव असून तो एकात्मतानगर, एमआयडीसी येथील रहिवासी आहे. त्याच्यावर बलात्काराचाही आरोप होता. परंतु, सरकार पक्षाला तो आरोप सिद्ध करता आला नाही. ही घटना १५ सप्टेंबर २०१५ रोजी घडली होती. त्यावेळी मयत तरुणी २० वर्षे वयाची होती. आरोपीने तरुणीवर बलात्कार केला व त्यानंतर तिचा खून करून मृतदेह इसासनीजवळच्या मिहान परिसरातील झुडपात टाकून दिला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. सोनेगावचे पोलीस निरीक्षक आर. आर. जगताप यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीला १७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सरकारतर्फे अॅड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.