नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:52 PM2018-11-15T23:52:27+5:302018-11-15T23:54:49+5:30
बेंगळुरुमधून नागपुरात रोजगाराच्या शोधात आलेल्या बालाघाटच्या एका महिलेला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तीन महिन्यांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करूनही त्याने नोकरी मिळवून दिली नाही. उलट तो आता मारहाण करून धमकी देऊ लागल्याने महिलेने तिच्या मूळगावी बालाघाटमध्ये त्याच्याविरुध्द बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेंगळुरुमधून नागपुरात रोजगाराच्या शोधात आलेल्या बालाघाटच्या एका महिलेला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तीन महिन्यांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करूनही त्याने नोकरी मिळवून दिली नाही. उलट तो आता मारहाण करून धमकी देऊ लागल्याने महिलेने तिच्या मूळगावी बालाघाटमध्ये त्याच्याविरुध्द बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे पाठविले आहे.
बलात्काराचा आरोप करणारी महिला ३५ वर्षांची आहे. ती मूळची बालाघाट (मध्य प्रदेश) मधील रहिवासी आहे. तिला एक मुलगा देखिल आहे. चांगल्या रोजगाराच्या शोधात ती बेंगळुरुला गेली होती. तेथे प्रशिक्षण घेऊनही मनासारखा पगार मिळत नसल्याने ती आॅगस्ट २०१८ मध्ये नागपुरात आली. येथे ती नोकरीच्या शोधात असताना एमआयडीसीतील राजेंद्र आचरे नामक आरोपीसोबत तिचा संपर्क आला. त्याने तिला चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर १८ आॅगस्टपासून तो तिच्याशी नोकरीचे आमिष दाखवून नियमित शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. तब्बल तीन महिने झाले तरी तो नोकरी लावून देण्याचे नाव घेत नसल्याने तिने ७ नोव्हेंबरला त्याला शरीरसंबंधास नकार दिला. यानंतर ती आपल्या गावाला निघून गेली. तिचा पत्ता माहीत असल्यामुळे आरोपी आचरे तिच्या बालाघाटमधील घरी गेला आणि तिच्यावर नागपुरात परत चलण्यासाठी दबाव निर्माण करू लागला. तिने नकार दिल्यामुळे त्याने तिला मारहाण करून धमकी दिली. परिणामी महिलेने बालाघाट पोलिसांकडे आचरेविरुद्ध तक्रार नोंदवली. नोकरीचे आमिष दाखवून त्याने तीन महिन्यात अनेकदा बलात्कार केला. आता आरोपीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तिने तक्रारीत नमूद केले. त्यामुळे बालाघाट पोलिसांनी शून्य (झिरो) क्राईमनुसार गुन्हा दाखल केला. मात्र, प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे बालाघाट पोलिसांनी बुधवारी हे प्रकरण तपासासाठी नागपूर पोलिसांना पाठविले. त्यानुसार, आता एमआयडीसी पोलीस आरोपी आचरेचा शोध घेत आहेत.