अल्पवयीन मैत्रिणीला पळवून नेऊन बलात्कार
By admin | Published: May 6, 2016 03:11 AM2016-05-06T03:11:22+5:302016-05-06T03:11:22+5:30
अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला पळवून नेणाऱ्या बार वेटरला पोलिसांनी अपहरण तसेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली.
आरोपी गजाआड : सोनेगावमधील घटना
नागपूर : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला पळवून नेणाऱ्या बार वेटरला पोलिसांनी अपहरण तसेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.
प्रमोद ऊर्फ निखिल प्रकाश डोंगरे (वय २३) असे आरोपीचे नाव असून, तो कामठी मार्गावरील पिवळी नदी भीमवाडी परिसरात राहतो. खापरीत (सोनेगाव) राहणारी मुलगी १५ वर्षांची आहे. ती दहावीची विद्यार्थिनी असून, आरोपी प्रमोदशी तिची मैत्री आहे. आरोपी सीताबर्डीतील एका बारमध्ये वेटर आहे. सीताबर्डीत येता-जाता ती त्याला भेटायची. खाणे-पिणे आणि फिरणेही व्हायचे. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रमोदने तिला फोन करून सीताबर्डीत बोलावले. पालक घरी असल्याने आठ वर्षीय आतेभावाला फिरवून आणण्याच्या बहाण्याने मुलगी घराबाहेर पडली. सीताबर्डीत आल्यानंतर तिच्यासोबत छोटा मुलगा पाहून आरोपी प्रमोद तिच्यावर चिडला. घरची सर्व मंडळी हजर असल्याने त्याच्या बहाण्यानेच आपण येथे येऊ शकलो, असे सांगून तिने प्रमोदला शांत केले. त्यानंतर लहान मुलाला घेऊन हे दोघे आरोपीच्या वस्तीत गेले. दरम्यान, रात्र झाली तरी मुलगी आणि तिच्यासोबत असलेला भाचा घरी परतला नसल्याने घाबरलेल्या पालकांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. मंगळवारी दुपारी १२ पासून अल्पवयीन मुलगी तिच्या छोट्या आतेभावासह बेपत्ता असल्याचे कळताच सोनेगाव पोलीस शोधाशोध करू लागले.
दरम्यान, बुधवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने आठ वर्षीय मुलाला खापरी भागात सोडून दिले. त्याने पोलिसांना सांगितलेला घटनाक्रम ऐकून सोनेगावचे ठाणेदार अशोक बागुल यांनी मुलगी तसेच तिच्या मित्राची शोधाशोध सुरू केली.(प्रतिनिधी)
मोबाईलवरून मिळाला धागा
मुलीजवळ मोबाईल होता. तिच्या नंबरवरून कुणाकुणाशी संपर्क झाला, त्याची माहिती घेण्यात आली. त्यात सर्वाधिक कॉल आरोपी प्रमोदचे दिसल्याने त्याचा पत्ता मिळवण्यात आला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी आरोपी आणि मुलीला सीताबर्डीतील सिनेमॅक्सजवळ ताब्यात घेण्यात आले. आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी प्रमोदला अटक केली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला.