बलात्कार पीडितेचे छायाचित्र केले व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:18 PM2018-08-21T22:18:42+5:302018-08-21T22:23:54+5:30

सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे दवाखान्यातील छायाचित्र काढून ते व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The rape victim's photo has been viral | बलात्कार पीडितेचे छायाचित्र केले व्हायरल

बलात्कार पीडितेचे छायाचित्र केले व्हायरल

Next
ठळक मुद्देउमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलराष्ट्रवादीच्या दोन महिलांचा बेजबाबदारपणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे दवाखान्यातील छायाचित्र काढून ते व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्चर्यकारक बाब ही की, सदर दोन्ही आरोपी महिला नागपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदावर आहेत. यापैकी एका महिलेकडे नागपूर येथे पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पदाचा कार्यभार आहे. दुसऱ्या महिलेकडे महासचिवपद आहे. अलका कांबळे आणि उर्वशी गिरडकर अशी त्यांची नावे आहेत. एका राष्ट्रीय पक्षामधील नेत्यांच्या असल्या बेजबाबदारपणाचा संताप सर्वत्र व्यक्त होत आहे.
यापूर्वीही या पीडितेची काही छायाचित्रे व्हायरल झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मैत्रिणीं अस्वस्थ झालेत. याप्रकरणी दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी आरोपी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्यासोबत नागपूरच्या खासगी रुग्णालयात पीडितेला हिंमत देण्यासाठी गेल्या. दवाखान्यात बेशुद्धावस्थेत असलेल्या पीडित महिलेचे छायाचित्र काढले. व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरलसुद्धा केले. दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर २२८ (अ) ही नवीन कलम अमलात आली.
नव्यानेच कायदा करण्यात आला. बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख उघड करणे हा गुन्हा असल्याचा नवा कायदा अस्तित्वात आलेला आहे. अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची नागपूर जिल्ह्यात बहुधा पहिलीच नोंद असावी, असे बोलले जात आहे. उमरेड पोलिसांनी याप्रकरणी २२८ (अ) कलमान्वये दिनांक २० आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश हाके करीत आहेत.

यू ट्युबवर व्हिडीओ
पीडितेच्या आईची मुलाखत असलेला आणखी एक व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. ९ मिनिट २ सेकंदाच्या या व्हिडीओत पीडितेच्या आईने आपला संताप आणि वेदनांना वाट मोकळी करून दिली. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या वठविली नाही. वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे. अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.या मुलाखतीत वैद्यकीय अहवाल मिळाला नसल्याचा संताप आणि पोलीस विभागावरही आरोप केला आहे. माझ्या मुलीस न्याय हवा. त्याला फाशी झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यामध्ये केले आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या व्हिडीओमध्ये आरोपींची संख्या अधिक असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. माझी मुलगी बरी झाल्यानंतर तिला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हिंमत देणार असल्याचाही विश्वास आईने व्यक्त केला आहे.

पोलीस कोठडी २२ पर्यंत
याप्रकरणी मामलेश कन्हैय्यालाल चक्रवर्ती (२०) आणि संतोष मांगीलाल माळी (४०) दोघेही रा. मध्यप्रदेश, देवास यांना अटक केल्या गेली. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. उद्या पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केल्या जाणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

थातूरमातूर कारवाई
वेकोलिमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार होऊनही वेकोली प्रशासन अद्याप कुंभकर्णी झोपेतच असल्याचा संताप व्यक्त होत आहे. वेकोलि प्रशासनाने आतापर्यंत केवळ दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सोबतच सहा जणांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली तर एका बड्या महिला अधिकाऱ्याची नागपूर मुख्यालयात बदली केलेली आहे. मुख्यालयी केलेली ही बदली म्हणजे शिक्षा की बक्षीस असाही आरोप आता होत आहे. वेकोलि मुख्य कार्यालयाचे सीएमडी चित्तरंजन मिश्रा, उमरेड वेकोलि क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम. के. मजुमदार यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. गोकुळ खाणचे प्रबंधक जी. एस. राव यांनाही तडकाफडकी बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही होत आहे. थातूरमातूर कारवाईने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Web Title: The rape victim's photo has been viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.