नागपुरात शाळेच्या इमारतीत चिमुकलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:58 PM2019-06-10T23:58:35+5:302019-06-10T23:59:02+5:30
समवयीन मुलांसोबत खेळत असलेल्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला उचलून नेऊन एका नराधमाने शाळेच्या आवारात तिच्यावर अत्याचार केला. रविवारी भरदुपारी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. अत्याचार करणारा नराधम भूषण दहाट (वय २५) फरार असून, त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना वृत्त लिहिस्तोवर यश आले नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समवयीन मुलांसोबत खेळत असलेल्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला उचलून नेऊन एका नराधमाने शाळेच्या आवारात तिच्यावर अत्याचार केला. रविवारी भरदुपारी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. अत्याचार करणारा नराधम भूषण दहाट (वय २५) फरार असून, त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना वृत्त लिहिस्तोवर यश आले नव्हते.
चिमुकली फुटाळा वस्तीतील रहिवासी आहे. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक अवस्था अत्यंत कमकुवत आहे. वडील मोलमजुरी करतात तर आई धुणीभांड्याचे काम करते. घरात सांभाळणारे कुणी नसल्याने तिची आई तिला कधी कधी सोबत कामाच्या ठिकाणी नेते. रविवारी दुपारी आईने चिमुकलीला अमरावती मार्गावरील कॅम्पस जवळच्या काचीमेट परिसरातील एका इमारतीत नेले. तेथील काही ठिकाणी आई धुणीभांड्याच्या कामाला गेली तर चिमुकली स्कूल ऑफ स्कॉलरच्या परिसरात समवयीन मुलांसोबत खेळू लागली. नराधम भूषण दहाटची बहीण शाळेत चपराशी असून, त्याचे वडील बाजूच्या अपार्टमेंटमध्ये चौकीदारी करतात. हा नराधमही सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास तो खेळत असलेल्या मुलांजवळ आला. त्याने इतरांना हुसकावून लावले आणि चिमुकलीला उचलून शाळेच्या आवारात नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर मुलीला सोडून दिले. काही वेळेनंतर मुलीची आई काम संपवून तिच्याजवळ आली. दोघी मायलेकी घरी परतल्या. सायंकाळी चिमुकली वेदनांनी ओरडू लागली. त्यामुळे आईने तिला जवळ घेऊन तिची पाहणी तसेच विचारणा केली. त्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला. नेहमीच तेथे जात असल्यामुळे आणि नराधम दहाट त्याच भागात राहत असल्यामुळे मुलगी त्याला ओळखत होती. तिने आईला झालेला प्रकार आणि आरोपीचे नावही सांगितले. मुलीच्या आईने लगेच आरोपीच्या बहिणीला फोन करून या कुकृत्याची माहिती कळविली. त्यानंतर आजूबाजूच्यांना घडलेला प्रकार सांगितला. सोमवारी सकाळी अपार्टमेंटमधील महिलांना मुलीवरील अत्याचाराची व्यथा सांगितली. महिलांनी पीडित मुलीच्या आईला धीर देत पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. बाजूचे सामाजिक कार्यकर्तेही सोबत आले.
पोलिसांची पाच तास चौकशी , सात तासानंतर मेडिकल
दुपारी १ च्या सुमारास पीडित मुलीला घेऊन तिची आई आणि काही सामाजिक कार्यकर्ते वाडी पोलीस ठाण्यात पोहचले. वाडी पोलिसांनी चिमुकली आणि तिच्या आईला तब्बल पाच तास ठाण्यात बसवून चौकशी केली. त्यानंतर साडेसहा ते सातच्या दरम्यान मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी मेयोत पाठविण्यात आले. रात्री ९.३० पर्यंत मुलगी तेथे होती. तिकडे भरपूर वेळ मिळाल्याने नराधम दहाट तेथून पळून गेला. रात्री १० पर्यंत त्याला अटक करण्यात वाडी पोलिसांना यश आले नव्हते.
परिसरात प्रचंड संताप
या घटनेमुळे काचीमेट, वाडी आणि फुटाळा परिसरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. नराधम दहाटच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांनी तत्परता दाखविली नाही तर या भागातील नागरिकांचा रोष उफाळून येऊ शकतो. यासंबंधाने वाडी पोलिसांकडे चौकशी केली असता आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस म्हणाले.